एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद- नारायण राणे

Narayan Rane - Sharad Pawar

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली असून, शनिवारपासून तीन दिवस ही मुलाखत प्रकाशित करण्यात येणार आहे. ‘एक शरद सगळे गारद’ असं टायटल संजय राऊतांनी या मुलाखतीला दिलं आहे. यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. शिवसेनेकडे मुलाखत घ्यायला माणसं नाहीत, असं दिसत आहे.

पण किमान ज्यांची मुलाखत घेतली, ते अनुभवी तरी आहेत. आधी ज्यांची घ्यायचे ते सगळं वाचून बसायचे. ‘एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’ अशी त्यांची स्थिती आहे. असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला. शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनेचे मंत्री आणि नेते यांचेच ऐकले जात नाही.

महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. शिवसैनिकांनाच कोणी विचारत नाहीत, अशी स्थिती आहे. मुंबईत पाच-पाच हजार जणांचे कोरोनामुळे प्राण जातात, राज्यात आठ हजार जण दगावले, हे राज्य सरकारचे अपयश आहे, असा घणाघात राणेंनी यावेळी केला. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा देत, कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेले चालणार नाही.

त्याचे आई, वडील, पत्नी गावी असतात. कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली तर आम्ही आंदोलन करू, त्यांना कोणत्याही पासची सक्ती करू नये. कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेईल, असं नारायण राणे म्हणाले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा? हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे, अशी खरपूस टीका राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पत्रकार परिषदेत केली होती.