एकतर स्टेडियमचे नाव बदला नाहीतर राहुलला तरी बदला, नेटकऱ्यांची भन्नाट सूचना

इंग्लंडविरुध्दच्या (India Vs England) टी-20 (T20) सामन्यांतील भारताचे आणि सलामी फलंदाज के.एल. राहुलचे (KL Rahul) अपयश हा चर्चेचा विषय आहे. भारतीय संघाच्या कामगिरीत तरी चढउतार आहेत पण राहुलच्या कामगिरी तर सातत्याने उतरणीचीच राहिल्याने क्रिकेटप्रेमींचा संताप झाला आहे. टी-20 सामन्यांच्या गेल्या चार डावात राहुलच्या नावावर फक्त एकच धाव असून तीनवेळा तो शून्यावर बाद झालेला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीत सातत्य असो वा नसो, राहूलच्या कामगिरीत मात्र सातत्य आहे अशी टीका क्रिकेटप्रेमी करू लागले आहेत. राहुल 0,1,0,0 अशा बायनरी कोडमध्ये (Binary Code). खेळतोय म्हणून त्याला समजणे अवघड असल्याची कोटी काहींनी केली आहे.

सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी न देताच आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे आणि विराट कोहलीच्या (Virat kohli) या संघनिवडीवर माजी क्रिकेटपटूंनीसुध्दा टीका केली आहे. कोहलीचा मुख्य टीकाकार गौतम गंभीरने तर सुर्यकुमारला वगळण्यासाठी त्याचा खेळ तरी पाहिलाय का, असा सवाल केला आहे. टी-20 सामन्यांच्या या मालिकेत भारताने प्रत्येक सामन्यात वेगवेगळी सलामी जोडी खेळवली यावरही टीका होत आहे.

या साऱ्या विवादात काहींनी राजकीय संदर्भसुध्दा जोडले आहेत.हे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहेत आणि त्यात के. एल. राहुल सतत अपयशी ठरतोय याला राजकीय संदर्भ देत काहींनी म्हटलेय की एकतर स्टेडियमचे नाव तरी बदला किंवा राहुलला तरी बदला. तोवर काही खरं नाही?

मात्र कर्णधार विराट कोहली मात्र राहुलच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्याने म्हटलेय की क्रिकेटपटूसाठी असा काळ येत असतो. दोन सामन्यांपूर्वी मीसुध्दा फाॕर्ममध्ये नव्हतो पण राहुल हा चांगला फलंदाज आहे. पुढच्या सामन्यांमध्ये तो नक्कीच चांगली कामगिरी करेल.

दरम्यान, विक्रमांची गोष्ट केली तर राहुलने गेल्या चार डावात 0, 1, 0, 0 अशा खेळी केल्या आहेत आणि टी-20 इंटरनॅशनलच्या इतिहासात इतर कोणत्याही सलामी फलंदाजाने सलग चार डावात एवढ्या कमी धावा केलेल्या नाहीत.

लागोपाठ दोन भोपळ्यांसह त्याने युसूफ पठाण, आशिश नेहरा, वाॕशिंग्टन सुंदर व अंबाती रायुडूच्या नकोशा कामगिरीची बरोबरी केली आहे. टी-20 सामन्यात लागोपाठ दोन डावात भोपळ्यावर बाद झालेला तो पाचवा भारतीय फलंदाज आहे.

त्याच्याआधी अंबाती रायुडू, आशिश नेहरा, युसुफ पठाण हे लागोपाठ दोनदा शून्यावर बाद झाले आहेत तर वाॕशिंग्टन सुंदर याने तर शून्यावर बाद होण्याची हॕट्ट्रिक केली आहे. टी-20 इंटरनॅशनल मध्ये अशी हॕट्ट्रिक नावावर असलेला तो एकमेव फलंदाज आहे.

दुसरीकडे, दुसऱ्या टी-20 सामन्यात फलंदाजीची संधीच न मिळालेल्या सूर्यकुमार यादवला वगळण्यावर बहुतेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सूर्यकुमारसाठी सहानुभूती वाटते असे बऱ्याच जणांनी म्हटले आहे. त्यात आकाश चोप्रा व ग्रॕमी स्वान यांचा समावेश आहे. मला आश्चर्य वाटते की तिसऱ्या सामन्यासाठी तू संघात नसशील हा संदेश सूर्यकुमारला कुणी दिला असेल असे आकाश चोप्राने म्हटले आहे. स्वान म्हणतो की कोणतीही चूक नसताना वगळले जाणे ही मी पाहिलेली सर्वात कठोर शिक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER