44 वर्षांची ही जिम्नॅस्टि खेळणार आठवे ऑलिम्पिक

सलग सात ऑलिम्पिक खेळलेली एकमेव जिम्नॅस्टिकसपटू

Oksana chusovitina

44 वर्षे हे काही स्पर्धात्मक खेळ खेळायचे वय नाही. जिम्नॅस्टिकससाठी तर नाहीच नाही आणि त्यातल्या त्यात खेळाडू महिला असेल तर मूळीच नाही. कुणीही हेच सांगेल पण ओक्साना चुसोव्हिटीना नावाची एक खेळाडू आहे, जिम्नॅस्टि -जी हा समज खोटा ठरवतेय. उझबेकिस्तानची ही खेळाडू जिम्नॅस्टिकसची काही साधीसुधी खेळाडू नाही तर आतापर्यंत सात ऑलिम्पिक खेळलेली खेळाडू आहे आणि आता 44 वर्षे वयात आठव्या ऑलिम्पिकच्या तयारीत आहे. सलग सात ऑलिम्पिक खेळलेली ती एकमेव जिम्नॅस्टि असून आता टोकियो ऑलिम्पिकसह ती हा विक्रमी आणखी पुढे नेणार आहे. विशीच्या आतीलच खेळाडूंचा खेळ मानला जाणाऱ्या या खेळात ओक्सानाची ही दीर्घ कारकिर्द सर्वांना आश्चर्यचकित करणारी तर आहेच पण प्रेरणा देणारीसुध्दा आहे.

44 वर्षे वयात ऑलिम्पिकच्या दर्जाच्या कसरती करण्याबद्दल ती म्हणते की,जिम्नॅस्टिकस माझे प्रेम आहे.तू जर करु शकते तर सराव करुन चांगली कामगिरी का नाही करायची असे मी स्वतःलाच विचारते. मी जर थांबले तर माझ्यासाठी ती मोठी खेदाची गोष्ट राहिल. आपले कुटूंब हे आपली सर्वात मोठी प्रेरणा असल्याचे मानणाऱ्या ओक्सानाने त्यांना टोकियो ऑलिम्पिक हे आपले शेवटचे ऑलिम्पिक असेल असा शब्द दिला आहे, अन्यथा तिची अजूनही पुढे खेळायची इच्छा आहे.

सोव्हियत रशियाच्या काळापासून ओक्सानाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मात्र सोव्हियत रशियाच्या विघटनानंतर ती 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा खेळली. तेंव्हा ती सांघिक सुवर्णपदकाची मानकरी ठरली पण तिला वैयक्तिक पदक जिंकण्यासाठी आणखी चार ऑलिम्पिक आणि 16 सामने वाट बघावी लागली.बीजिंग 2008 ऑलिम्पिकमध्ये तिने व्हॉल्ट प्रकाराचे रौप्यपदक जिंकले. विशेष म्हणजे त्यावेळी हे रौप्यपदक तिने रशियासाठी नाही तर जर्मनीसाठी जिंकले. 2002 मध्ये ती आपल्या मुलाच्या ल्युकेमियावरील उपचारासाठी जर्मनीत स्थलांतरीत झाली होती.मात्र आता ती आपली मायभूमी उझबेकिस्तानचे प्रतिनिधित्व करते आणि उझबेकी जनतेत तिला एवढा मानसन्मान दिला जातो की त्यांनी तिच्यावर पोस्टाचे तिकिट काढले आहे.

टोकियोनंतर थांबण्याचा निर्णय कसा घेतला याबद्दल ती सांगते की, ज्या मुलासाठी ती जर्मनीत गेली होती त्या 20 वर्षीय अलीशेरच्या आग्रहाखातर तिने विश्रांतीचा निर्णय घेतला आहे. मला कदाचित गंभीर दुखापत होईल किंवा मी आजारी पडेल अशी त्याला काळजी वाटते.

आतापर्यंत खेळलेल्या सात ऑलिम्पिकमधील सर्वात संस्मरणीय गोष्ट कोणती हे सांगताना ती म्हणते की, बीजिंग ऑलिम्पिकमध्ये व्हॉल्टचे रौप्यपदक जिंकले त्यावेळी आपल्या सोबतच्या पदक विजेत्या चीन व उत्तर कोरियाच्या खेळाडू आपल्यापेक्षा किमान 10 वर्ष लहान होत्या. आणि ते पदक जिंकून मी परतले तर डॉक्टरांनी मला आणखी मोठी खूशखबर दिली की माझा मुलगा आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. कोणत्याही पदकापेक्षा माझ्यासाठी हे मोठे बक्षीस होते.

ती अतिशय उच्च दर्जाची खेळाडू आहे, तिला तिचे शरीर काय आहे हे माहित आहे आणि ते काय करु शकते याचीही माहिती आहे. आम्हाला फक्त तिचा उच्च दर्जा कायम ठेवायचा एवढेच काम आहे असे तिच्या प्रशिक्षिका ल्युदमिला ली म्हणतात.

ओक्साना चुसोव्हितीनाचे पती बाखोदीर कुर्बानोव्ह हे स्वतःसुध्दा आॉलिम्पिक खेळलेले पाच कुस्तीगिर आहेत. त्यांनी ग्रिको-रोमन कुस्तीमध्ये 1996 व 2000 च्या ऑलिम्पिकमध्ये उझबेकीस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. ओक्सानाच्या कारकिर्दीसाठी त्यांनी आपले खेळणे थांबवले आणि अलीशेरच्या प्रकृतीकडेही लक्ष दिले आणि या निर्णयाचा त्यांना जरासुध्दा पश्चाताप नाही.

कुर्बानोव्ह म्हणतात की, आम्ही तर चार ऑलिम्पिकचाही विचार केलेला नव्हता, आठ ऑलिम्पिक खेळणे तर फारच दूरची गोष्ट होती. पण ओक्सानाने हा विक्रम करुन अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आता शेवटी विश्रांतीचा निर्णय घेतल्यावर ओक्सानाने निवृत्तीनंतर उझबेकी खेळाडूंसाठी ताश्कंद येथे जिम्नॅस्टिकस अकादमी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय लोकांमध्ये जिम्नॅस्टिकसची आवड वाढावी यासाठी जिम्नॅस्टिकस थिएटर शो सुरु करण्याचा आणि त्यात व्हॉल्ट व बीमच्या कसरतींचे प्रदर्शन करायचा तिचा विचार आहे.