आठ वर्षांनंतर ‘ती’ खेळली आणि आठव्या मॅचपॉइंटवर जिंकली

Rebecca Marino

रिबेका मारिनो (Rebecca Marino) …हे नाव फारसे परिचयाचे नाही; कारण कॅनडाची (Canada). ही महिला टेनिसपटू तशी फारशी यशस्वीसुद्धा नाही किंवा गाजलेलीही नाही; पण तरीसुद्धा मेलबोर्न येथे सोमवारी ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) सुरू होताच पहिल्या फेरीतला तिचा ऑस्ट्रेलियाच्या किंबर्ली बिरेलवरील विजय सर्वांत लक्षवेधी राहिला तो पाच कारणांसाठी…

१) एकतर दुखापती, नैराश्य (Depression) आणि अलीकडेच वडिलांना
गमावल्याच्या मोठ्या दुःखावर मात करत तिने हा विजय मिळवलाय.
२) दुसरे म्हणजे आठ वर्षांतील तिचा हा ग्रँड स्लॅम स्पर्धेचा पहिलाच सामना होता.
३) तिसरे म्हणजे हा सामना जिंकायला तिला तब्बल आठ मॅचपॉइंट लागले.
४) या सामन्यात पहिला सेट ६-० असा आणि पहिले सलग ७ गेम जिंकल्यावरसुद्धा
तिला ६-०, ७-६ (११-९) असा संघर्ष करावा लागला.
५) आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या मेन ड्रॉमध्ये खेळताना तिने
पात्रता फेरीच्या तीन सामन्यांत एकही सेट गमावलेला नव्हता.

व्हँकुव्हरच्या ३० वर्षीय खेळाडूचा हा जिद्द व चिकाटीचा प्रेरणादायी प्रवास आहे. त्यात २०११ नंतर पहिल्यांदाच ती ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्या फेरीचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाली आहे. पहिला सेट तिने फक्त २३ मिनिटांतच ६-० असा संपवला. आठव्या गेमपर्यंत प्रतिस्पर्धी बिरेलला एकही गेम घेता आलेला नव्हता; पण तिथून सामना बिरेलने टायब्रेकरपर्यंत लांबवला. टायब्रेकरमध्येही बिरेलने थोडथोडके नाही तर तब्बल सात मॅचपॉइंट वाचवले; पण आठव्यावर रिबेका यशस्वी झाली आणि २०११ नंतर पहिल्यांदाच ती ग्रँडस्लॅमच्या दुसऱ्या फेरीत पोहचली. रिबेका मारिनो ही २०११ मध्ये जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानी होती.

मेंफिस येथील स्पर्धेच्या अंतिम फेरीतही ती पोहचली होती; पण सोशल मीडियावरील शिवीगाळ व टीकेने व्यथित होऊन तिला प्रचंड नैराश्य आले आणि त्या नैराश्यापोटीच तिने २०१२ मध्ये तिने निवृत्ती घेतली. या प्रवासाबद्दल ती म्हणते की, आयुष्यातील प्रत्येक काळ सारखाच नसतो व तो कायमसाठीही नसतो. तुमची मन:स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही लोकांशी बोलणे किंवा इतर काही पावले उचलणे फार महत्त्वाचे आहे. मला वाटते, मी ते केले म्हणूनच मी आज पुन्हा टेनिस कोर्टवर आहे. या आठ वर्षांत माझ्या खेळात फारसा बदल झालाय असे वाटत नाही.

अजूनही माझी सर्विस आणि बेसलाईन ग्राउंडस्ट्रोक चांगले आहेत. खेळ बदललाय तशी मी त्याला स्लाईसची जोड दिली आहे आणि नेटजवळूनही खेळायला लागले आहे, असे ती सांगते. २०१२ मध्ये टेनिस सोडल्यावर ती नौकानयनाकडे (Rowing) वळली होती. तिचे काका हे नौकानयनातील कॅनडाचे एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते (१९६४) आहेत. या काळात ते टेनिस खेळत नसली तरी इतरांना टेनिस शिकवत मात्र होती. २०१२ नंतर २०१९ मध्ये पुनरागमन करतानाच तिने पहिली स्पर्धा सेट न गमावता जिंकली.

पुढच्या स्पर्धेतही तिची अशीच कामगिरी राहिली आणि आणखी एक विजेतेपद पटकावून तिने पुनरागमनात सलग तीन स्पर्धा जिंकल्या. गेल्या एप्रिलमध्ये तिच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. या दुःखातून सावरत नाही तोच तिला दुखापत झाली आणि चालणेसुद्धा मुस्कील झाले. मात्र गेल्या सप्टेंबरपर्यंत ती तंदुरुस्त झाली आणि पुन्हा खेळू लागली. आपल्या वडिलांची लढण्याची जिद्द आणि त्यांनी स्वीकारलेली आव्हाने याने आपल्याला पुनरागमनासाठी प्रेरित केले, असे ती सांगते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER