म्यानमारच्या आठ तब्लिगींची खटला रद्द केल्याने झाली सुटका

हायकोर्ट म्हणते पुराव्याअभावी खटला चालविणे व्यर्थ

High court nagpur

नागपूर: दिल्लीत गेल्या मार्चमध्ये झालेल्या तब्लिगी जमातच्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी आलेल्या म्यानमारच्या (ब्रह्मदेश) आठ नागरिकांविरुद्ध भारतात येऊन बेकायदा धर्मप्रचार करणे आणि ‘कोविड’( COVID) निर्बंधांचे उल्लंघन करून महामारीच्या फैलावास मदत करणे इत्यादी आरोपांवरून दाखल केलेला खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench of Mumbai High Court)रद्द केला आहे.

नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याने या परदेशी नागरिकांना अटक करून त्यांच्यावर विदेशी नागरिक कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा व भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली दंडाधिकारी न्यायालयात तपासानंतर आरोपपत्र दाखल केले होते. या पोलिसी कारवाईविरुद्ध या म्यानमारी नागरिकांनी याचिका केली होती. ती मंजूर करून न्या. व्ही. एम. देशपांडे व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने त्याच्यावरील गुन्हा व त्या अनुषंगाने दाखल केलेला खटला रद्द केला.

न्यायालयाने म्हटले की, पोलिसांनी तपासात नोंदविलेले आणि आरोपपत्रासोबत सादर केलेले साक्षीदारांचे जाबजबाब पाहिले तर या विदेशी नागरिकांवरील आरोपांत काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट होते. पुढे पुराव्याअभावी जो खटला यशस्वी होणार नाही तो वेळीच रद्द न करणे अन्यायाचे होईल.

न्यायालयाने असेही नमूद केले की, या म्यानमारी नागरिकांना त्यांच्या मातृभाषेखेरीज अन्य कोणताही भाषा येत नाही. साक्षीदारांचे जबाब पाहिले तर त्यांनी येथील वास्तव्यात कुरआन व हादिसचे पठण केल्याचे दिसते. याला व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करून केलेला धर्मप्रचार मुळीच म्हणता येणार नाही. शिवाय दिल्लीहून नागपूरमध्ये आल्यावर  आमदार निवासातील ‘क्वारंटाइन’ केंद्रात ठेवले तेव्हा त्यांची कोरोना चाचणी केली असता ती ‘निगेटिव्ह’ आली होती. त्यामुळे त्यांच्यामुळे साथीचा प्रसार झाला, या म्हणण्यातही काही तथ्य नाही.

गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही तब्लिगी जमातच्या कार्यक्रमासाठी आलेल्या २९विदेशी नागरिकांविरुद्धचा असाच खटला रद्द केला होता. माध्यमांतील विखारी आणि भडक प्रसिद्धीमुळे या विदेशी नागरिकांना निष्कारण ‘बळीचा बकरा’ बनविले गेले, असे नमूद करून त्या निकालात पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले होते.

नागपूर खंडपीठाने क्रिमिनल अ‍ॅप्लिकेशन क्र. ४५३/२०२० मध्ये दिलेला मूळ निकाल निकाल या लिंकवर वाचता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER