हर्सुल कारागृहात पाच मिनिटात ईदची प्रार्थना

कारागृहातील कैद्यांना मास्कचे वाटप

Harsul Jail Aurangabad

औरंगाबाद : रमजान ईदनिमित्त सोमवारी सकाळी हर्सुल कारागृहातील कैद्यांनी बरॅकबाहेर अवघ्या पाच मिनिटात प्रार्थना पठण केली. त्यावेळी सुमारे दोनशे कैद्यांना मास्कचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा अठराशे कैद्यांना मास्क वाटप केल्याची माहिती कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली.

औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात दरवर्षी रमाजान ईदला मौलवींना बोलावून सामुहिकरित्या सर्व सर्कल, स्वतंत्र विभाग, अति सुरक्षा विभाग, व रुग्णालयातील कैद्यांना एकत्र करुन मोकळ्या पंटागणात प्रार्थना पठणाचा कार्यक्रम आयोजीत केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिकरित्या प्रार्थना पठणाचा कार्यक्रम घेता आला नाही. कारागृहातील बंदींची क्षमता ५७९ इतकी असूनही सध्या कारागृहात अठराशेपर्यंत कैदी आहेत. रमजानच्या महिन्यात रात्री व पहाटे रोजाचा उपवास सोडताना जेवण देणे सोयीस्कर व्हावे म्हणून नवीन व जुने सर्कल बनविले जातात.

नवीन सर्कलमध्ये नऊशेपर्यंत तर जुन्या सर्कलमध्ये सध्या आठशेपर्यंत कैदी आहेत. आज सकाळी रमजान ईदची प्रार्थना पठण करता यावी म्हणून कैद्यांना त्यांच्या बरॅकच्या रुमबाहेर सोडण्यात आले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटात प्रार्थना पठण करुन सर्व कैदी बरॅकमध्ये निघून गेले. १९ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू असल्याने कारागृहातील अधीक्षक, अधिकारी व कर्मचारी कारागृहातच आहेत. बाहेरील कोणत्याही व्यक्तिला आत प्रवेश दिला जात नसून, कारागृहात सर्व उपाययोजना करण्यात आल्याचेही अधीक्षक जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER