ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीला परवानगी नाही

CM Thackeray-eid-milad-un-nabi-celebration

मुंबई :- येत्या ३० ऑक्टोबरला राज्यात ईद-ए-मिलाद साजरी (Eid milad un nabi celebration) होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनेनुसार इतर धार्मिक सणांप्रमाणे हा सण साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीला परवानगी नाही, असेही यात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनातर्फे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीला परवानगी देता येणार नाही. पण प्रतीकात्मक स्वरूपात खिलाफत हाऊस, मुंबई येथील मिरवणुकीला एका ट्रकसह १० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

तसेच खिलाफत हाऊस या ठिकाणी शासनांच्या नियमांचे पालन करून पाच  जणांना धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या प्रवचनाचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावा. त्याचे केबल टीव्ही, फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात यावे.

कंटेन्मेंट झोनमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले असून त्यात कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. मिरवणुकीच्या स्वागतासाठी मंडप  बांधण्यासाठी नियमांचे पालन करावे. त्या ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती नसावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे. ईद-ए- मिलादनिमित्त मुस्लिम वस्तीत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील (पाणपोई) लावण्यात येतात. हे बांधण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती नसावी. तसेच या ठिकाणी सीलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करावे. त्या ठिकाणी स्वच्छता राखावी.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सोसायटीमधील नागरिकांनी एकत्रित जमत सण साजरा करू नये. रक्तदान शिबिर किंवा आरोग्य शिबिर असे उपक्रम राबवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER