सर्व बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न

Chandrakant Patil
  • कर्जवसुली थांबविण्याचा बँकांना आदेश
  • ६ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : “अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. त्यामध्ये यंदा प्रथमच सर्व फळबाग यांचाही समावेश करण्याचा प्रयत्न करू. ” अशी ग्वाही पुण्याचे पालकमंत्री व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता. ४) येथे दिली. अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करण्यात येत असून संबंधित विभागांना तसेच आदेश दिले आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ६ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करा, असे आदेशही त्यांनी दिले.

ही बातमी पण वाचा : सुप्रिया सुळे यांच्याकडून चंद्रकांत पाटलांना पिकांचा आणि फळांचा गुच्छ भेट

पुरंदर तहसील कार्यालयात पुरंदर, बारामती, इंदापूर येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, दादासाहेब कांबळे, तहसीलदार रूपाली सरनोबत, सोनाली मेटकरी, विजय पाटील आदी उपस्थित होते. बाधित क्षेत्रांचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे, आवश्यकता भासल्यास पंचनाम्याची पथके वाढविण्यात यावीत. प्रसंगी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचीदेखील मदत घ्यावी, असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले. प्राथमिक स्तरावर १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

उर्वरित मदत केंद्र सरकारकडे मागू. हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही ते म्हणाले. पालकमंत्री पाटील यांनी प्रारंभी तालुकानिहाय नुकसानीचा आढावा घेतला. तत्पूर्वी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकाळी पुरंदर तालुक्यातील भिवरी, बोपदेव, चांबळी, हिवरे येथील अतिवृष्टीने ग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहात महत्त्वाची पावले
– दहा हजार कोटी रुपये नुकसान भरपाई यापूर्वीच जाहीर
– निधीची कमतरता भासू देणार नाही
– फळबागांना प्रथमच नुकसान भरपाईचे संरक्षण देण्यासाठी प्रयत्न
– पीक विम्याचे कवच वाढवण्यास व्यापक मोहीम
– नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवण्याचे बँकांना आदेश
– प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांचा शिवारात जाऊन ऑन ग्राउंड रिपोर्ट