ग्रामीण भागातील जनतेच्या सुखकर प्रवासासाठी प्रयत्न – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

परिवहन विभागाची आढावा बैठक

Anil Parab

मुंबई : ग्रामीण भागातील जनतेला एसटीच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षित, जलद, सहज प्रवास व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, असे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले.

मंत्रालयात आज परिवहन विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ॲड.परब बोलत होते.

ॲड. परब म्हणाले, महाराष्ट्राची लाईफलाईन म्हणून एसटी बस सेवेकडे पाहिले जाते. यासाठी ही बससेवा सुरळीत, नियमित सुरु ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. एसटी महामंडळांनी प्रवाशांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त प्रवास सुखकर कसा करता येईल याकडे अधिक लक्ष द्यावे. ग्रामीण भागातसुद्धा वातानुकुलीत सेवा सुरु करण्यासाठी महामंडळांनी विचार करावा आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुखकर प्रवास सुविधा उपलब्ध करुन द्यावी.

भरती प्रक्रिया सुरु असताना समांतर आरक्षण या न्यायालयाच्या निर्णयामुळे ज्या भरती प्रक्रिया थांबल्या आहेत, त्याचा अभ्यास करुन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून सहानुभूतीपूर्वक विचार करुन न्याय देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासनही ॲड. परब यांनी दिले.

यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, महाव्यवस्थापक (वाहतूक) राहूल तोरो उपस्थित होते.