सीएए समर्थनार्थ विद्यार्थ्यांकडून पोस्ट कार्डवर संदेश लिहिल्याने शिक्षणमंत्र्यांची शाळेला नोटीस

मुंबई :- विद्यार्थ्यांचा राजकीय कारणासाठी वापर करण्यात येऊ नये, अशा आशयाच्या नोटीस राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना पाठवण्यात आल्या आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ मुंबईतल्या एका शाळेत विद्यार्थ्यांकडून पोस्ट कार्डवर पंतप्रधानांसाठी संदेश लिहून घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हे आदेश दिले आहेत.

माटुंग्यातील दयानंद बालक विद्यालय आणि दयानंद बालिका विद्यालयात सीएए समर्थनार्थ पोस्ट कार्ड लिहून घेण्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर या दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षण उपनिरीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस पाठवून याबाबत खुलासा करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांना शालेय शिक्षण विभागाकडून नोटिसा पाठवून याद्वारे विद्यार्थ्यांचा कोणत्याही राजकीय कामासाठी वापर होता कामा नये, असा आदेश देण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीने या संदर्भातील हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, सीएएवरून राजकारण सुरू असल्याचा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. शालेय  शिक्षण विभागाच्या या निर्णयावर भाजपाने टीका केली असून सीएएला डाव्या संघटना आणि विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही मोहिमा सुरू केल्या आहेत. भाजपाकडून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांकडून सीएएच्या समर्थनार्थ संदेश लिहून घेण्याचे तसेच बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

देशभरात सीएएविरोधात प्रचंड विरोध होत असताना केंद्र सरकारने १० जानेवारीपासून देशभरात हा कायदा लागू केला आहे. तर अनेक राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी न करण्याची भूमिका घेतली आहे. शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्यासाठी विभागातर्फे ‘थिंक टँक’ स्थापन करण्यात येणार असून, यामध्ये समाजातील विविध घटकांना स्थान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात पालकांचाही समावेश करण्याचा विचार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.