शिक्षण सर्वांसाठी !

Education

आज शिक्षणाविषयी लिहिण्याचे मनात येण्यामागे कारण हे की जेव्हा केव्हा आरोग्यविषयक, आहार विषयक ,रूढी-परंपरांवर विषयक प्रश्न किंवा समस्या समोर येतात तेव्हा त्याबाबत अनेक गैरसमज , अफवा यांना महापूर येतो. अफवा अशा असतात की ऐकून थक्क व्हावें. सुशिक्षित अशिक्षित सगळेच लोक आपल्या शैक्षणिक पातळ्या प्रमाणे त्याला बळी पडतात .म्हणून विचार मनात येतो की शिक्षण खरंच मानवाच्या व्यवहारी जगण्यासाठी काम करते आहे का? किती लोक खरोखर शिक्षणापर्यंत पोहोचतात आहेत ?त्यात काय अडचणी येत आहेत ? शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचले किंवा पोचवायला पाहिजे. आपण या विषयक काय करू शकतो ? याचा विचारही शिक्षित माणसाच्या मनात येत नाही .आणि अनुभव हेच सांगतो की असे समज गैरसमज असणाऱ्या लोकांचे विचार अत्यंत ठाम आणि बदलण्यास अत्यंत कठीण असतात ,म्हणूनच जेव्हा समाजात प्रश्न उभे राहतात, संकट येतात तेव्हा गैरसमज अफवा दूर करण्यापेक्षा देशातील जनतेच्या साक्षरतेवर काम करणे हे खूप आवश्यक असते. नाहीतर तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे होते .पुन्हा या विषयक, काम करताना त्याविषयी असणारी माहिती आपल्याला पूर्ण नसते .मिळणाऱ्या सरकारी योजनांची माहिती ती जुजबीच असते .पण प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची कशी होते ? होते की नाही? पुस्तके शालेय उपयोगी वस्तू फुकट मिळतात का? त्या त्यांच्यापर्यंत वेळेवर पोहोचतात का? शिक्षक पुरेसे आहे का?

या प्रश्नांवर उपाय म्हणून, मुख्य म्हणजे आजचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर एक उपयुक्त शिक्षण प्रकार म्हणून ,”डोअर स्टेप स्कूल ची कल्पना आवडली. आणि मग त्या विषयी माहिती जाणून घेतली. रजनी परांजपे या डोअर स्टेप स्कूलच्या संस्थापिका. निर्मला निकेतन आणि जपान येथील शिकोकु क्रिश्चन युनिवर्सिटी येथे मिळून वीस वर्षांपेक्षा जास्त काळ सोशल वर्क संबंधित अनेक विषय शिकवले. आणि कॉलेज ऑफ रिसर्च वर्ग येथे रिसर्च विभाग प्रमुख म्हणून काम केले. 1990 मध्ये थायलंड मध्ये झालेल्या जागतिक परिषदेत, युनिसेफ, युनेस्को, वर्ल्ड बँक यासारख्या पाच मोठ्या संस्थांनी यजमान पद स्वीकारले होते. यात अनेक शिक्षण तज्ञ, शिक्षण प्रसाराची तळमळ असलेली मंडळी ,श्रीमंत देशाचे प्रतिनिधी, शिक्षणापासून वंचित मुले जिथे मोठ्या प्रमाणात होती अशा गरीब आणि अविकसित देशांचे प्रतिनिधी देखील तेथे हजर होते. त्या सगळ्यांनी मिळून दोन हजार पर्यंत जगभरातील सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळवून देण्याचा संकल्प सोडला आणि “सर्वांसाठी शिक्षणाचा” नारा आसमंतात घुमवला. तो आज पर्यंत घुमतच राहीला. फक्त स्वप्नपूर्तीचा दिवस पुढे पुढे सरकत सरकत 2020 पर्यंत जाऊन पोहोचला. जे काम दहा वर्षात आता वेगळे होईल असे वाटत होते ते काम पुरे करायला तीस वर्षे पुरली नाहीत .ही झाली स्थिती जागतिक पातळीवरची !

आपल्या देशाची परिस्थिती ही फारशी निराळी नाही .खरंतर शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचावे संपूर्ण समाज किमान साक्षर तरी असावा हे आपले स्वातंत्र्य प्राप्ती पासून चे ध्येय होते. त्यासाठी आजपर्यंत टीच वन each वन पासून 2009च्या शिक्षण हक्क कायदा पर्यंत, आणि मागच्या वर्षी झालेल्या शैक्षणिक बदलापर्यंत खूप कायदे हक्क ऐकले. पण मग खरा प्रश्न काय आहे की आपण साधे दिसणारे ध्येय गाठू शकत नाही? त्यात काय अडचणी आहेत ? समाजातला असा कुठला वर्ग आहे की जो अजूनही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही ?त्याची कारण काय त्याच्यावर उपाय योजना काय करता येतील ? असे प्रश्न निर्माण झाले तेव्हा डोअर स्टेप स्कूल बाबतचे अनुभव जाणून घ्यावेसे वाटले.

त्यांना आलेल्या अडचणी समजावून घेतल्या, त्यासाठी वाचन केले. जे जाणवलं ते शेअर करावसं वाटलं. रजनी परांजपे यांच्या कॉलेज तर्फे स्कूल सोशल वर्क नावाचा एक प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या काही शाळांमधून चालत होता. कॉलेजचे विद्यार्थी फिल्डवर्क चा भाग म्हणून तिथे जात असत .काही विद्यार्थी सुपर्विजन साठी रजनी ताईन कडे होते. स्कूल सोशल वर्क हा प्रकल्प आणि त्याचा आलेला अनुभव यावरूनच त्यांना डोअर स्टेप स्कूल ची कल्पना सुचली. आणि यासाठी स्वतंत्र संस्था देखील स्थापन याची गरजही या कामातूनच लक्षात आली .कारण विद्यार्थी किंवा स्वयंसेवक यांच्या सहाय्याने शिक्षणाचे काम होऊ शकणार नाही हे आता त्यांना अनुभवाने कळले होते. कारण शिकवायचा म्हटलं की वक्तशीरपणा आणि नियमितपणा या दोन्ही गोष्टी सातत्याने पाहायला लागतात म्हणजे त्यासाठी पगारी माणूस हवा.

काम करताना त्यांच्या लक्षात आलं की ही कामासाठी चाललेली धडपड आहे, ही जी शर्यत आहे, अडथळ्यांची आहे, खूप अडचणी त्याच्यामध्ये येणार आहे. पुण्यातच चिंचवड आणि रावेत परिसरातली तीस-चाळीस घरांची वस्ती नंदीबैलवाले किंवा उंटवाले यांची होती त्यांची पंचवीस-तीस मुलं पण शिक्षणाशिवायच वाढणारी. त्याची कुणाला खंत ही नव्हती ,काळजीही नव्हती, इच्छाही नव्हती. म्हणजे असं काही करायला हवं ही जाणीवच नव्हती. अर्थातच त्यांना तयार करणं हे किती जिकिरीचं काम असेल हे आपल्याला लक्षात येईल. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांना आले. मुले बस पर्यंत येऊ शकतात मात्र मुली प्रयत्न करूनही येत नसत. कारण त्यांच्याकडे नेहमीच काम असायचं, घर सांभाळणे ,मुले सांभाळणे, त्याचप्रमाणे शेळ्या सांभाळणे. एका शिक्षिकेने एक दिवस गोड बोलून निरनिराळ्या गोष्टी सांगून थोड्या वेळ तरी चला म्हणून मुलींना बस पर्यंत आणले. पण वेगळाच अनुभव आला, अचानक आरडाओरडा झाला .एका कुत्र्याने एक शेळीचे करडू पळवले, आणि मग करडू तर जिवानिशी गेले, पण मुलीलाही मार मिळाला . आधीच अनुकूलन नसलेले पालक आणखीनच प्रतिकूल झाले.

(केरळ उच्च न्यायालया प्रमाणे )कायद्याप्रमाणे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राज्य सरकारला दोन गोष्टी बंधनकारक आहेत. एक म्हणजे प्रत्येक मुलासाठी त्याच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिसरात प्राथमिक शाळा आणि दुसरी शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी वाहतूक व्यवस्था करणे. अनुभव असा की प्रत्यक्षात शाळा स्थापन करणे तर दूरच पण वाहतूक व्यवस्था देण्यासाठीही स्थानिक सरकार खळखळ करते याचा अनुभव त्या घेतात. सरकारने करायची सोय आम्ही करून देतो तेव्हा आम्ही सोपा पर्याय निवडतो. वाटेतला अडथळा दूर करतो कारण मुलांना शिकवण हे पहिले ध्येय आहे असेही त्या म्हणतात.

त्यांच्या अनुभवानुसार, मुले केवळ त्यांच्या सोयीची त्यांच्या परिस्थितीला साजेल अशी लवचिक सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था नाही, म्हणून देखील शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहतात. अशांसाठी “शिक्षण मित्र “सारखे उपक्रम म्हणजेच जिथे कामाला जातात. तिथले सुपरवायझर शिक्षण मित्र म्हणून काम पाहतात . लोकसहभागाची गरज लक्षात घेऊन उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.

या मुलांची घरची परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात येतं की पाठ्यपुस्तका शिवाय त्यांना काही वाचायला मिळावं अशी ती नाही .शाळांमधून मुलांना पुस्तकांची सोय असते, पण पुस्तके हरवतील या भीतीने मुलांपर्यंत पोहोचतच नाही . वाचता न येणे ही तर अतिशय मोठी गंभीर समस्या सगळ्याच शाळांमधून बर्‍याच प्रमाणात दिसून येते.

म्हणूनच अशा रूढी परंपरा किंवा गैरसमज अफवा ऐकायला मिळतात, तेव्हा लोक किती अशिक्षित आहेत यावर बोलण्यापेक्षा आपण आपण सुशिक्षित असूनही सगळ्यांसाठी शिक्षण पोहोचवण्यासाठी कमी का पडतो हा प्रश्न मला नेहमी पडतो आणि मन खिन्न होतं.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button