एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस : ईडी ( ED) दाखवली तर आता सीडीही निघणार, राष्ट्रवादीचा इशारा

Eknath Khadse-NCP

मुंबई : माजी भाजपवासी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील भाजप अडचणीत आल्याचे महाराष्ट्राने पाहिले. खडसेंनी नुकाच बीएचआरचा घोटाळा उघडकीस आणला होता त्यानंतर आता एकनाथ खडसे यांना ईडीने (ED) नोटीस पाठवल्याची माहिती आहे.

यावरून राष्ट्रवादीने संताप व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपची ही हुकूमशाही सुरु आहे. ईडीची नोटीस ही सूडबुद्धीने देण्यात आली आहे”, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे.

मिटकरी म्हणाले, “मागच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस पाठवली होती. आता खडसेंना पाठवली आहे. खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळायला लागले आहेत. त्या धास्तीने केंद्र सरकारकडून हे दबावतंत्र वापरले गेले आहेत. ज्यादिवशी एकनाथ खडसे यांनी पक्षप्रवेश केला त्याचदिवशी त्यांनी हे ईडीची नोटीस देतील, असं सांगितलं होतं. पण ते ईडी देतील तर मी सीडी दाखवील, असं विधान त्यांनी केलं होतं. ईडी दाखवली तर सीडीही निघणार आहे. भाजपचं हे दबावतंत्राचं राजकारण आहे. भाजप हुकूमशाही गाजवत आहे. या कारवाईला काही अर्थ नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“खडसेंना ईडीचे समन्स हे होणारच होतं. महाराष्ट्रात ज्यांनी भाजप विरोधात मोहिम उघडली, त्यांच्याविरोधात केंद्र सरकारकडून दबावगट निर्माण करुन अशा पद्धतीच्या नोटीस दिल्या जाणार आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार अर्नव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौतचा मुद्दा मांडला होता. प्रताप यांनी हक्कभंगाचा एल्गार पुकारला होता. त्यानंतर त्यांना ईडीने नोटीस पाठवली”, असा दावा त्यांनी केला.

“आता महाराष्ट्राच्या जनतेलादेखील माहिती पडलंय, कशाप्रकारे यंत्रणांचा चुकीचा फायदा घेऊन भाजपचे लोकं धिंगाणा घालत आहेत. लोकांना हे जवळपास लक्षात आलं आहे”, असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

दरम्यान, आपल्याला ईडीकडून कोणतीही नोटीस अद्याप आलेली नाही. आल्यावर बोलू अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी टीव्ही9 ला दिली आहे.

ही बातमी पण वाचा : त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावे; पण, मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, : एकनाथ खडसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER