ईडी चौकशी : विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंना मिळाला मोठा मुद्दा

Raj-Thackeray

मुंबई : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून या प्रकरणामुळे सुस्त पडलेल्या पक्षसंघटनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

नुकताच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यावर सतत निशाणा साधला होता. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते प्रचारात मागे पडत असताना राज यांनी एकहाती विरोधाचा किल्ला लढविला होता. निकालावर याचा परिणाम झाला नसला तरी मनसेसाठी राजकीय जागा तयार झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी ईव्हीएमचा मुद्दा हाती घेत भाजपविरोधात रणशिंग फुंकले होते. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. २१ ऑगस्टला मुंबईत ईव्हीएमविरोधात विरोधकांचा मोर्चाही काढण्यात येणार होता. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला. विरोधी नेत्यांनी ईव्हीएमच्या मुद्दा लावून धरला असला तरी त्याचा थेट परिणाम जाणवत नव्हता.

ही बातमी पण वाचा : मनसेची ईडीला नोटीस

ईडीच्या नोटीसीमुळे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी राज यांच्यासह विरोधकांच्या हाती मोठा मुद्दा मिळाला आहे. राजकीय सूडबुद्धीने चौकशींचे सिसेमिरे मागे लावण्याचे भाजपचे धोरण असल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. हे सर्व थांबायला हवे, असे मतही विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ईडीच्या चौकशीमुळे राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चौकशीसाठी ईडी कार्यालयाकडे जाताना राज ठाकरे यांच्या सोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब होते. त्यातून या एकंदर चौकशीच्या प्रकरणाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न झाला.

राज ठाकरे यांनी केलेल्या शांतता राखण्याच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. मात्र कार्यकर्त्यांनी राज यांच्याविरोधातील वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सहकुटुंब चौकशीला जाण्यावरून राज यांच्यावर टीका केली. त्यामुळे दमानियांना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. चिडलेल्या महिला कार्यकर्त्यांनी तर दमानिया यांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी मुंबईतील त्यांच्या घराचाही शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. स्वत: राज यांनी योग्यवेळी या विषयावर सविस्तर बोलणार असल्याचे जाहीर केले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी एक नवीन मुद्दा यानिमित्ताने राज यांच्या हाती लागला आहे.

ही बातमी पण वाचा : बघतोच, किती दिवस मुस्कटदाबी करणार हे सरकार ! – राजू शेट्टी