इक्बाल मिर्चीच्या दुबईतील २०० कोटींच्या मालमत्ता ईडीने केल्या जप्त

Midwest Hotel Apartment - Iqbal Mirchi - ED

नवी दिल्ली : दाऊदच्या टोळीतील एक म्होरक्या इक्बाल मिर्चीच्या (Iqbal Mirchi) दुबईतल्या २०० कोटींच्या १५ मालमत्ता ईडीने (ED) जप्त केल्या आहेत. यात एक हॉटेल अपार्टमेंट, १४ व्यापारी आणि निवासी इमारतींचा समावेश आहे. या १५ मालमत्तांची किंमत २०३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली.

या मालमत्ता इक्बाल मिर्चीच्या नातेवाईकांच्या नावांवर आहेत व त्या ‘मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट’ अंतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत.

इक्बाल मिर्ची हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक होता. १९९४ मध्ये सरकारने त्याला तडीपार केले होते. दाऊद टोळीचा अंमली पदार्थांचा बाजार तो सांभाळत होता. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलने नोटीसही जारी केली होती. १९९५ मध्ये तो विदेशात पळून गेला. ऑगस्ट २०१३ मध्ये लंडन येथे इक्बाल मिर्चीचा मृत्यू झाला.

मुंबईत इक्बाल आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाच मालमत्ता आहेत. खंडाळ्यात सहा एकर जमीन मेसर्स व्हाइटच्या नावावर आहे. या मालमत्तांचा ताबा इक्बालच्या दोन मुलांकडे आहे. मुंबईतील ‘साहिल बंगलो’ इक्बालची पत्नी आणि मुलाच्या नावावर आहे. वरळीतील ‘समंदर महल’ येथील मालमत्ता इक्बालची बहीण व मेहुण्याच्या ताब्यात आहे. या सगळ्या मालमत्तांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. इक्बाल मिर्ची याची दुबई येथे असलेल्या पंधरा मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER