जेवणाचे नियम व वाढण्याच्या पद्धती- आयुर्वेद दृष्टीने

ताट कसे वाढावे हे आई आपल्या मुलांना शिकवीत असते. बऱ्याच वेळा आईचे बघून बघून मुलं शिकतात. पंगतीत ताट वाढण्याची एक लय असते. एका विशिष्ट पद्धतीने वाढपी न बोलता पटापट अन्नपदार्थांनी ताट सजवत असतात. व्यवस्थित वाढलेले ताट बघितले की भूक वाढते. याचा अनुभव प्रत्येकाने घेतलाच असेल. आयुर्वेदातसुद्धा अन्न कसे वाढावे, आधी काय खावे याबद्दल काही नियम सांगितले आहेत. अर्थात या नियमांमागे शास्त्र आहे. त्याचे शरीरावर, पचन (Digestion) संस्थेवर परिणाम होतात म्हणून ते पाळणे महत्त्वाचे ठरते.

  • पेय पदार्थ उदा. पाणी, ताक हे ताटाच्या डाव्या बाजूस ठेवावे.
  • चटण्या, कोशिंबीर इत्यादी पदार्थ ताटाच्या डाव्या बाजूस वाढावे.
  • भात /पोळी असे पदार्थ ताटाच्या मधोमध ठेवावे.
  • दातांनी तोडून चावून खाण्याचे पदार्थ उदा. लाडू, वडे असे पदार्थ ताटाच्या उजव्या बाजूला वाढावे.

भोजनाच्या सुरुवातीला गोड, तूप घातलेले स्निग्ध पदार्थ खावेत. कारण जठराग्नी तीव्र असते. त्यामुळे गोड पचायला जड पदार्थ सुरुवातीला घ्यावे. खीरपुरी, श्रीखंडपुरी, पुरणपोळी, आंब्याचा रस, हलवा असे सर्वच पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला ग्रहण करावे. आधी गोड खाल्ल्याने आपोआप बाकी जेवण योग्य प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे पाचनावर ताण पडत नाही. आजकाल आधी गोड खाल्ले तर बाकी गोष्टी खाता येणार नाही असे म्हणत तिखट चटपटीत पदार्थ आधी घेतले जातात व शेवटी गोड खाल्ले जाते. त्यामुळे पाचन बिघडते.

जेवणाच्या शेवटी

जेवणाच्या मध्ये आंबट, खारट, तिखट, कडू पदार्थ खावेत म्हणजे भाज्या, कोशिंबीर, आमटी इत्यादी पदार्थ.

सर्वांत शेवटी ताक घ्यावे. ताक द्रव पाचन करणारे असल्याने जेवणाच्या शेवटी घ्यावे. न तक्रसेवी व्यथते कदाचित्। भोजन शेवटी ताक पिणाऱ्यांना कधीच पाचनाचे त्रास होत नाही. अर्थात हे ताक ताजे नुकत्याच विरजलेल्या दह्याचे असावे. पोट तडीस किंवा गळ्यापर्यंत अन्न येईल असे जेवू नये. हातात ताट घेऊन किंवा हातावर अन्न घेऊन जेवू नये.

जेवणानंतर हात स्वच्छ करून दातात अडकलेले कण दंतशलाकाने ( टूथपीक) साफ करावे. तोंडातील लाळ, वास निघण्याकरिता चूळ भरावी. बोटांच्या पेरांनी नेत्र धुवावे. नंतर ताम्बूल विडा घेऊन मुखशुद्धी करावी.

शतपावली करून डाव्या कुशीवर थोडा आराम करावा. पातळ पेय पदार्थ जास्त घेतले असतील तर झोपू नये. जेवणानंतर लगेच गाडी चालविणे, वाहनात बसणे, अग्नी जवळ बसणे, उन्हात बसणे वर्ज्य करावे.

कदाचित या सर्व गोष्टी अनेक जण पाळतही असतील. काहींना माहिती असेल; पण कामामुळे जमत नसेल. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे की, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER