पान खाताय, पण या पानाचा इतिहास माहितीये का ?

Paan

भारतात कुठेही तुम्हाला चौकाचौकात तुम्हाला इतर काही मिळो न मिळो, पण पानवाला नक्की सापडेल. दक्षिणेकडून जसंजसं आपण उत्तरेला जातो तसंतसं पण मिळण्याचं प्रमाण पण वाढत जातं. याच पानांबद्दल आज जाणून घेणार आहोत.

पानाचा (Paan) इतिहास खूप जुना आहे. एका आख्यायिकेनुसार शिव आणि पार्वतीने मिळून पानाचं बी लावलं होतं. त्यांनी हिमालयात हे रोपटं लावल्यानंतरच पानाची खरी सुरुवात झाली अशी आख्यायिका प्रचलित आहे. यानुसारच पानाला हिंदू धर्मात विशेष स्थान मिळालं. इंदू धर्मातील सण, उत्सव आणि पूजांमध्ये पानाने जागा मिळवली.

पानाला तुळस, दुर्वा सारखंच महत्व आहे. पूजेच्या गोष्टींमधील महत्वाचा घटक पानाला मानलं जातं. पानाच्या उगमाबद्दल या सगळ्या आख्यायिका असल्या तरीही पानाचा खरा उगम कसा झाला याची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

रामायण आणि महाभारतातही पानाचा उल्लेख आढळतो. रामायण (Ramayana) आणि महाभारतात (Mahabharat) पूजेच्या साहित्यात आणि हारासाठी पानं वापरल्याचा उल्लेख सापडतो.

रामायणाबद्दल असलेली आख्यायिका अशी की, जेव्हा हनुमान सीतेला सोडवण्यासाठी लंकेत जातो. तेव्हा रामाने दिलेला संदेश सीतेला मिळाल्यानंतर सीता खुश होते. संदेश घेऊन आपल्याला वाचवायला आलेल्या हनुमानाला काहीतरी द्यायला हवं असा विचार सीतेच्या मनात येतो. परंतु देण्यायोग्य कोणतीही वस्तू सापडत नाही. जवळच असलेल्या पानाच्या झाडाकडे सीतेचं लक्ष जातं आणि त्या पानांना एकमेकांत ओवून एक हार तयार करून हनुमानाला तो हार घालते. याच आख्यायिकेनुसार हनुमानाला पानं वाहण्याची परंपरा सुरु झाल्याचं म्हटलं जातं.

महाभारतातल्या आख्यायिकेनुसार, महाभारताचं युद्ध जिंकण्यासाठी अर्जुनाला एक यज्ञ घालायचं होतं. यज्ञ सुरु करण्यापूर्वी पंडिताने अर्जुनाला पानं आणायला सांगितली. अर्जुनाने खूप शोधल्यानंतरही अर्जुनाला ही पानं मिळू शकली नाहीत. पण पानांशिवाय पूजा सुरु होऊ शकत नव्हती. त्यामुळे अर्जुनाला पानं शोधायला नागलोकात जावं लागलं. नागलोक अशी एकमेव जागा होती जिथे पानं मिळू शकत होती. त्यामुळे अर्जुनाला नागलोकात जाऊन नागलोकाच्या राणीकडून पानं मागावी लागली आणि यज्ञ संपन्न झाला. याच कारणामुळे बऱ्याच ठिकाणी या पानांना ‘नागरबेल’ म्हटलं जातं.

पौराणिक कथांचा विचार बाजूला ठेवला तर आयुर्वेदातही पानाचा उल्ल्लेख आढळतो.हजारो वर्षांपासून पानाचा औषध म्हणून वापर होत असल्याचे पुरावे आहेत. असं म्हणतात कि धन्वंतरी आणि अनेक आयुर्वेदिक विद्वानांनी मिळून पानाचे गुणधर्म शोधून काढले होते. सगळ्यात आधी पानाचा वापर उंदरावर करण्यात आला होता. जेव्हा त्यांना समजलं कि हे माणसानेही खाण्यायोग्य आहे तेव्हा त्यांनी माणसांवर पानाचे होणारे परिणाम तपासले. सगळ्यात प्रभावी परिणाम त्यांना पचनशक्ती वाटला. पान खाल्ल्याने पचनक्रिया सुकर होते हे तेव्हापासून सिद्ध झालंय.

चिकित्सातज्ज्ञ सुश्रुत यांचं म्हणणं होतं की पान खाल्ल्याने आवाज साफ राहतो. तोंडाचा दुर्गंध येत नाही आणि जीभेलाही याचा फायदा आहे.

काळा बरोबर पानावर वेगवगेळे प्रयोग होत राहिले. मुघलांनी पानाचं नवं रूप या भूमीला दाखवलं. पानात चुना, वेलची आणि आणि लवंग टाकायला त्यांनीच सुरुवात केली. शाही दरबारात जवळपास प्रत्येकाला पण खायला आवडत असे.

पानाचा उपयोग मुखशुद्धीसाठी असला तरीही शाही दरबारात प्रत्येकाला पण दिलं जात नसे. दरबारात फक्त खास लोक आणि मित्रांनाच मुघल पण देत असत. बदलत्या काळानुसार मुघल काळात पानाला अनन्यसाधारण महत्व आलं होतं. उत्तरप्रदेशातील मोहाबमध्ये मुघल भूमिकराऐवजी लोकांकडून पानं घेत असत. यावरून आपल्याला पानांची मागणी आणि महत्व दोन्ही गोष्टींचा अंदाज येतो.

नूरजहाँने तर पानाचा एक वेगळा उपयोग करून दाखवला. पण खाल्ल्यावर ओठ लाल होतात. त्यामुळे ओठ रंगविण्यासाठी तिने पानांचा उपयोग केला. लिपस्टिक सारखा पानाचा उपयोग होऊ शकतो असा विचारही कुणी केला नसेल पण हे खरंय.

यानंतर पान खाणं सर्वसाधारण गोष्ट झाली. लखनऊमध्ये तर पान खाणं संस्कृतीचा भाग बनलं. आज अनेक प्रकारचे पण आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यावर नवनवे प्रयोग करून हल्ली चॉकलेट पानासारखे प्रकारही दिसायला लागले आहेत. अवस्थेपासून सुरु झालेला पानाचा प्रवास आता भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय झालाय.

ही बातमी पण वाचा : भारताच्या पहिल्या महिला इंजिनिर… ए. ललिता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER