“खाऊ आनंदे !” (भाग चार)

स्त्री जन्माची कहाणी --

Women Nutrition

मागील दोन्ही भागांमध्ये लहान मुलांमधील कुपोषणाची वाढती टक्केवारी लक्षात घेता, तसेच बालमृत्यू आणि कमी किंवा जास्त वजनाची (ओबेसिटी) समस्या लक्षात घेताना यामागे स्त्री आरोग्याचा भाग सगळ्यात महत्त्वाचा असल्याचं लक्षात आलं .सध्याच्या स्थितीत मुली लवकर थकतात, दमतात असंही ऐकण्यात येत.त्यामुळे तर स्त्रीच्या किंवा आईच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो.

“वी आर व्हॉट वुई इट ! “असे म्हटले जात होते .पण आता शास्त्रज्ञ म्हणतात ,स्त्रीच्या स्त्रीत्वाचा प्रवास ती जन्माला येण्याआधी सात महिने तिच्या आईच्या गर्भातच सुरू होतो. तज्ञांच्या मते आईचे कुपोषण केवळ एकाच पिढीला त्रास दायक ठरत नसून, पुढेही काही पिढ्यांमध्ये उतरू शकते.

स्त्रीचे आरोग्य तिच्या ओव्हरिजच्या आरोग्यावर ,तर ओव्हरिज चे आरोग्य आईच्या गर्भातील, तेही पहिल्या दोन महिन्यातील पोषणावर अवलंबून असते .

एकूणच वयात येण्याचा काळ, प्रेग्नेंसी काळ आणि नंतर ऋतू समाप्तीचा काळ या तीनही काळांमध्ये स्त्री शरीरात भरपूर बदल होतात.

* त्याच्या जोडीला जीवनशैलीतील बदलांचा, तिच्या आरोग्यावर खूप परिणाम होताना दिसतो. खाण्याच्या पद्धती ,सवयी आणि पदार्थ ,धावपळ ,(व्यायाम नाही) बैठे काम, ताणतणाव यामुळे तर सगळा समतोल बिघडायला वेळ लागत नाही.

* निसर्गाची रचना !स्त्री ही कितीही पुरुषांच्या बरोबरीने काम करत असली तरी त्यामागील कटुसत्य आपण नाकारू शकत नाही, ते म्हणजे स्त्रीचं अस्तित्व आहेच वंश चालविण्यासाठी ! तिच्या शरीराची रचना,शरीरात घडणार्‍या घटना ह्या त्यादृष्टीनेच घडतात .आणि हे नाकारले तर त्याचे परिणाम तिलाच भोगायला लागतात.

* या पार्श्वभूमीवर तिची “सुपरवुमन बनवण्याची धडपड “हीसुद्धा त्याला कारण आहे. मी अष्टभुजा होऊन सगळेच कसे उत्तम पार पाडू शकते .असा तिचा प्रयत्न आहे .हा तिला स्वतःलाच घातक आहे. मग घरातले लोक थोडंसं कौतुक करतात आणि स्त्रिया एकदम धन्य होतात .परत सुपरवुमन चा वेष घालतात.
घरातील इतर लोक एवढे दोन कौतुकाचे शब्द बोलून कर्तव्य मुक्त होतात आणि हे स्त्रीला कळतही नाही. कुणाला मदत मागणे वा घेणे हे त्या किती दिवस नाकारणार आहेत?

* स्त्रीच्या स्वभावाची घडण, हीसुद्धा याला पुष्कळशी जबाबदार आहे. मागच्या पिढीपर्यंत तरी नक्कीच सहन करण्यात आनंद मानायचा, स्वार्थ त्यागात सुख समजायचं ,आणि घराचं घरपण राखत स्वतःचे व्यक्तिमत्व ही राखायचं ही तारेवरची कसरत ती करते आहे. निसर्गाने सोपवलेल्या जबाबदारयांसोबत ,इतर जबाबदाऱ्या वाढवून ,शरीर मनावरचा ताण वाढवून घेतल्याने तिची पोषणाची गरज वाढते आहे.

* सुखासीन स्त्रिया नोकर नोकरी धंद्याचा व्याप नसला ,तरी इतर व्यापात गुंतलेल्या असतातच. एकीकडे शारीरिक हालचाल कमी पडते .तर चमचमीत पदार्थ आणि गोड पदार्थ विविध निमित्त्याने खाल्ले जातात. परिणामतः “खाऊन पिऊन उपाशी “अशी त्यांची स्थिती असते.

*डॉक्टर डेव्हिड बार्कर या शास्त्रज्ञाने ” womb theory of Adult life “हा सिद्धांत सर्वप्रथम मांडला. त्यावरून हे निश्चितपणे म्हणता येते की माणसाचे केवळ आरोग्यच नव्हे तर ,त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व गर्भातील या नऊ महिन्याच्या वास्तव्यावर अवलंबून असते .यानुसार ते म्हणतात,” फक्त गरोदरपणात घेतलेल्या सुधारित आहाराचा परिणाम पुढील पिढीवर होत नाही तर वर्षानुवर्षे चे पोषण उपयोगात येत असते.”

* कमी वजनाच्या मुलांना स्निग्ध पदार्थांचे पचन आणि कॅलरीयुक्त आहार पचवता येत नाही. त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते.

हृदय ,फुफ्फुस ,मेंदू, मज्जासंस्थाची बैठक पहिल्या तीन महिन्यात होते .गर्भातील आणि मातापित्यांचे कुपोषण असेल तर “फोरब्रेन “ची वाढ खुंटते. मेंदूचे अपंगत्व, वागण्यात दोष, गुन्हेगारी वृत्तीकडे कल ,चारित्र्याबद्दल फारशी चाड नसणे .इत्यादी प्रकार संभवतात.

दंगेखोर, चिडखोरपणा असलेली, दुध न पचणारी ,एलर्जी होणारी, आणि वारंवार इन्फेक्शन होणारी मुले जन्माला येऊ शकतात.

* वयात येणाऱ्या मुलींना जमिनीवर बसायची वेळच येत नाही. टेबल खुर्चीवर बसण्याच्या सवयीने ओटीपोटाच्या स्नायूंची म्हणावी तशी हालचाल होत नाही .त्याचा परिणाम पुढे त्यांना बाळंतपणात भोगावा लागतो .त्याचप्रमाणे अपुऱ्या आणि चुकीच्या आहारामुळे पुढे बाळंतपणात दूध न येण्याचाही प्रश्न उद्भवतो.

*चुकीच्या आहार पद्धतीमुळे वयात येणाऱ्या मुली बरेचदा बंडखोर, न ऐकणाऱ्या ,भावनाप्रधान, भित्र्या, स्वतःविषयी ठाम नसलेल्या, अस्थिर अशा वाटतात. पाळीच्या आधी तर हा फरक प्रकर्षाने जाणवतो. स्त्रियाही याबाबत वैताग ,दडपण, खचून जाणे ,पाठ पाय डोके दुखणे, कधी मुलांवर कधी इतरांवर राग निघणे ,नाहीतर मनाशी कुढणे या सगळ्यातून जात असतात

या सगळ्याचं कारण कॅल्शियमची कमतरता! कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. रुथ ओकाय यांच्या संशोधनानुसार कॅल्शियम मिळाले नाही तर शरीरावर ताण वाढून शरीरात काही बदल घडतात. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढते .स्नायूंवर परिणाम होऊन त्यातून कळा येऊ लागतात.

*पोषण चांगले असेल तर खरं म्हणजे वयात येणे हेही सहजतेने पार घडतं आणि मेनोपॉज ही तितकाच सहजतेने पार केल्या जाऊ शकतो. कारण हे सगळे निसर्गचक्र आहे.पण एकूणच आपण निसर्गावर आरुढ होण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो आहे तो शेवटी आपल्यालाच भोवतो आहे.

* या पार्श्वभूमीवर आईचं हे कर्तव्यच आहे की तिच्या वाढत्या वयाच्या मुलींच्या आहाराकडे प्रकर्षाने लक्ष देणे. “डायट प्लॅन “हा नेहमीच ‘फिगर मेण्टेन’ करण्यासाठी नसतो. तर त्याचा उद्देश खरतर ‘फिटनेस वा तंदुरुस्ती’ असायला हवा म्हणजेच,” पूर्ण आरोग्य” किंवा “तनाची आणि मनाची आरोग्यपूर्ण स्थिती !”

तज्ञांच्या मते स्त्री आरोग्यासाठी तीन अन्नघटकांची गरज विशेषतः असते. फुल प्रोटिन्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए ! शरीराची जोमदार वाढ, आंतरस्त्रवीग्रंथींचे कार्य प्रथम प्रोटिन्स नंतर अ जीवनसत्व व नंतर कॅल्शिअम या खनिजावर अवलंबून असते.

दूध ,दुधाचे पदार्थ किंवा दुधाची पावडर याबरोबरच सर्व प्रकारच्या डाळी, मोडाची कडधान्य यांचा दररोजच्या आहारात समावेश करायला लागेल .कुठलेही प्रोटीन जर पूर्ण प्रोटीन व्हायचे असेल तर धान्य अधिक कडधान्य यांचे मिश्रण पूर्ण प्रोटीन्सचे फायदे मिळवून देतं .

कॅल्शियमसाठी नाचणी सारखा दुसरा स्त्रोत नाही. नाचणीचे पीठ कडधान्य आणि सोयाबीनचे एक चतुर्थांश भाग पीठ अश्या मिश्र धान्याचे पराठे आणि इतर पदार्थ करता येतात.

आंबवण्याच्या प्रक्रियेतून ‘ ब ‘गटातील जीवनसत्त्वे मिळतात . इडली डोसा उत्तप्पा आप्पे.

सालासकट शेंगदाणे खाण्यात असावेत, दाणे ,फुटाणे, गूळ ,खजूर याचा खाऊ मुलांना देऊ शकतो.

कोशिंबिरी ,सॅलड, भाज्या आणि कुठलीही सिझनल फळं आणि त्याच्या जोडीला दररोज दही किंवा ताक आणि चमचाभर घरचे तूप या घरातल्या आहारातून सगळं काही मिळतं. भाज्या सालं न काढता वापरणे, सालाच्या चटण्या करणे. तसेच दररोज साठी जवस, तीळ ,कारले, शेंगदाणे याच्या तेलबियांच्या चटण्या वापरात आणाव्या.

महाराष्ट्रीय जेवण म्हणजे खरं तर उत्तम आहाराचा नमुना आहे .डावी आणि उजवी कडची बाजू आणि वरण भात तूप लिंबू ! व्वा ! अशा आहाराला तोड नाही फक्त गरज आहे ती हा आहार दररोज आणि प्रायोरिटी ने घेण्याची !

(संदर्भ : डॉक्टर मालती कारवारकर लिखित अन्नपूर्णेशी हितगुज आणि जंक फूड कि स्वास्थ्य सौंदर्य ? )

मानसी फडके
एम.ए.मराठी.
एम एस काऊंसेलिग सायको थेरपी.
एम ए सायकॉलॉजी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER