“खाऊ आनंदे !” (भाग-3)

balanced diet

जीवनशैलीतील बदल आणि पोषक आहार. खरं तर “समतोल आहार” हा शब्द आज सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्याचं नियोजन करणं मात्र सगळ्यांनाच एक कठीण काम वाटतं. जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलामुळे तर हे महाकठीण होऊन बसलेले आहे. कशामुळे बदलली आहे ही जीवनशैली एवढी?

*व्यवसायानुरुप जगणे ! रात्री ड्युटी तर सकाळी झोपायचं, 8 ते 3 ची ड्युटी असेल तर चार ला जेवायचं, सेल्सची ड्युटी असेल तर दिवस दिवसभर फिरत राहायचं. कुठल्याही कामात सतत असणारी डेडलाईन ,टारगेट ! यामुळे त्यासाठी भूक, तहान ,झोप पणाला लावायची .लहान मुलेसुद्धा सकाळी सहाला दप्तराचे ओझे घेऊन बाहेर पडणार ती संध्याकाळी सातला सगळे क्लासेस आटपून घरी येतात. या वेळामध्ये ब्रेकफास्ट , दुपारचे जेवण तर जाऊ द्या ,चालता चालता आणि बोलता बोलता खावं लागायला लागलं. रेल्वे आणि बस ने किंवा लोकल ने अप-डाऊन करायचे, त्यामुळे जेव्हा, जिथे, जे मिळेल ते, उदाहरणार्थ बर्गर, वडापाव खाऊन घेणे! असे सगळ्या जीवनात रंग रूप पालटले आहे.

काहीना काही कारणांनी स्त्रियांची स्वयंपाक घरातील आणि घरातली कामे बदलली, किंवा कमी झाली. नोकरी व्यवसायामुळे ,सुबत्तेमुळे ,वाढत्या वयामुळे, रोजची कामे मोलकरणींच्या मदतीने करून घेण्याची पद्धत वाढली. रिकामा वेळ बरचसा बसून गप्पा मारणे, टीव्ही पाहणे अशात जाऊ लागला. घरी होत नाही, म्हणून बाहेरून पदार्थ मागवण्याची पद्धत सुरू झाली. सरसकट बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खाणे ही जीवनपद्धती बनली. उभ्याच्या ओट्यावरची कामे वाढली. त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स सारखे प्रॉब्लेम वाढले. जास्त वेळ ऑफिस मधील एसी आणि प्रदूषित हवेतच वेळ जाऊ लागला. सूर्य मावळल्यानंतर घरी जायला मिळत असल्याने आणि जाता येतानाही प्रदूषणाला तोंड हे द्यावेच लागते .स्त्रीच्या शरीराला पोषणाची असणारी गरज फार जास्त आहे. कामासाठी कॉम्प्युटरचा वापर दर आठवड्याला 20 तासांपेक्षा जास्त असेल तर अशा स्त्रियांनी खरंतर आपल्या आहाराचा नक्कीच विचार करायला पाहिजे.

आपल्या शरीराला कोणते अन्नघटक कमी पडत असतील ? कारण आज दररोज सरासरी दहा तास कंप्यूटर पुढे बसण्याचे प्रमाण आहे. आणि त्यानंतरही बराचसा वेळ मोबाईल व माध्यमांच्या आधारे जातो .कारण इतर करमणूक ,गाणी ऐकणे, पिक्चर बघणे, पुस्तक वाचणे ,इतर मैत्रिणी मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग हे सगळं फक्त एका मोबाईल, लॅपटॉप वरूनच केले जाते या एका जागी बसून काम करण्यामुळे लठ्ठपणा वाढणे ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे हालचालींच्या अभावामुळे शरीरातील कॅल्शियम योग्य प्रमाणात कार्यरत होत नाही.

आज सरसकट सगळीकडे रात्री बाराला झोपायचं ,आणि मग सकाळी उशिरा उठायचं हीच पद्धत रूढ होते आहे. ऑफिस टाईम मुळे झोपण्याच्या वेळेचा प्रश्न आहे तो वेगळा ! ऑफिस मधून घरी आल्यावर स्वयंपाक करून, फ्रेश होऊन, जेवण करून झोपायला बारा वाजतात. सकाळी सातला धावत-पळत उठून कशीतरी तयारी करून, कॉफी बिस्किटे घेऊन बाहेर पडावं लागतं.

त्याची जास्त किंमत स्त्रियांनाच भोगावी लागते. तिच्या शरीराची रचना ,शरीरात घडणार्‍या घटना ,या सगळ्यांची योजना वंशाला पूरक अशीच केलेली आहे .सुट्टीच्या दिवशी पण इतर दिवशी ची धावपळ नको म्हणून उशिरा अकरापर्यंत उठणे ,सगळे व्यवहार उशिरा ,जेवण, एखादे बाहेरचे काम केले की रात्र ! परत दुसऱ्या दिवशी पासून पहिले पाढे पंचावन्न!
आज कामाची पद्धत आणि जगण्याची पद्धत जरी बदलत गेली तरी शरीर आणि शरीराची गरज मात्र तीच राहिलेली आहे ,आणि त्यामुळेच सगळा घोळ होतो. अशा या जीवनशैलीबद्दल बदलण्याचा परिणामही भोगावा लागत आहे. मल्टिनॅशनल कंपन्यांमुळे येणारे व्यावसायिक बदल ,त्याचा जीवन पद्धतीवर होणारा परिणाम जास्तीत जास्त तरुणांना भोगावा लागत आहे.

आपल्या शरीराचे एक जैविक घड्याळ असते. ज्याला आपण “बायोलॉजिकल क्लॉक” म्हणतो. पूर्वीचे जगणे हे त्याप्रमाणे होते. म्हणजेच निसर्गनियमानुसार होते. शरीरातल्या ग्रंथींमध्ये सर्वात वरच्या बाजूला असणारी ‘पीनियल ग्रंथि’. रात्रीच्या संपूर्ण अंधारात साधारणतः रात्री नऊ ते सकाळी आठ च्या दरम्यान’ मेलॅटोनीन ‘नावाचा हॉर्मोन तयार करून रक्तात सोडत असते .हा स्त्राव रात्रीच्या वेळी निघत असला तरी त्याची तयारी दिवसभराच्या आपल्या खाण्यातून मिळणाऱ्या योग्य अन्न घटकांपासून होते . या मेलाटोनिन च्या कमतरतेचा परिणाम सुरुवातीला उशिरा झोप, अधून मधून येणारी जाग, स्मरणशक्तीवर परिणाम, असा जाणवत असला तरी पुढे ,औदासिन्य, अल्झायमर, डिप्रेशन ,डायबेटिस ,कॅन्सर आणि मज्जासंस्थेच्या विकाराना कारण ठरतो.

आत्तापर्यंत आपण बघितले की लाइफस्टाइल बदलल्यामुळे स्ट्रेस ही प्रचंड प्रमाणात वाढतो. स्ट्रेसचे जसे इतर दुष्परिणाम आहेत, तसे पोषक आहाराची कमतरताही स्ट्रेस मुळे निर्माण होते.

म्हणूनच मेडिकल सायन्स नुसार लाइफस्टाइल बदलली की स्ट्रेस कमी होतो असे म्हटले आहे .परंतु अभिनेते, प्रोडूसर, एअर होस्टेस, हॉटेल इंडस्ट्रीतील लोक, लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे कंडक्टर, होतकरू डॉक्टर्स, सर्वांच्या शरीरात कॉर्टीसोल /ॲडरिनेलीन यांच्या पातळ्या कायम जास्त असतात. या वाढलेल्या स्ट्रेस ची पातळी आपले प्रताप चाळिशीनंतर दाखवू लागतात.

बदलत्या जीवनशैलीनुसार आपले बदललेले खाद्य आणि पेय हेही आरोग्यावर आणि पोषणावर परिणाम करणारे आहेत. सॉफ्ट ड्रिंक तेसुद्धा व्यसन असू शकते .यामुळे रिकाम्या उष्मांक पोटात जातात .त्याने पोषण मिळत नाहीच. पण पोट भरण्याचा केवळ आभास निर्माण होतो आणि इतर चांगले खाण्याची इच्छा कमी होते. स्ट्रेस वाढतो .याशिवाय दातावरील एनामल विरघळून कॅल्शियमची कमतरता जाणवते .त्याचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. कॅल्शियमची होणारी शरीरा तील काढघाल, कार्यातला असमतोल मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा ठरतो. कॅफेन नावाचं द्रव्य जास्त पोटात गेले तर मानसिक चलबिचलता वाढते. परत जर हे सॉफ्ट ड्रिंक ,पोटात गेलं नाही रक्तातील साखरेची पातळी वारंवार खाली जाते .यालाच “हायपोग्लायसेमिया” म्हणतात. ह्यामुळे शरीर परत सॉफ्ट ड्रिंक ची मागणी करू लागते.

आजच्या उच्च दर्जाच्या नोकऱ्या ह्या “3 P’s “ची मागणी करतात. म्हणजे पर्सनॅलिटी ,परफॉर्मन्स, आणि प्रॉटडक्टिविटी ! यामुळे शरीर आणि मेंदू यांना शिण येतो म्हणजे शरीराची झीज होते. ती भरून काढण्यास गरज असते अन्नाची. 21 व्या शतकातील प्रदूषणाला तोंड देणारी प्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी आणि कम्प्युटरचा अतिवापर करणाऱ्यांसाठी प्रमाणबद्ध प्रोटिन्स आणि ए विटामिन ही जोडगोळी मदत करते.. याशिवाय खाद्यपदार्थातील बदल जो आपल्या शरीराला खूप मारक होतो याचाही विचार करावा लागेल. उदा. बिस्किटे, वेफर्स, भजी, समोसे, वडे ,चकल्या, कडबोळी, फ्रेंच फ्राइज, बर्गर ,पेस्ट्रीज अशा कुरकुरीतपणा असणाऱ्या पदार्थांमध्ये असणारे” ट्रान्स फॅटी ऍसिड” हे सध्याच्या लठ्ठपणा ,मधुमेह आणि हार्ट प्रॉब्लेमला पोषक ठरते.

म्हणूनच आपल्या शरीराची वाढलेली आहाराची गरज, आपल्या उंची, वजन, जीवनशैलीच्या प्रमाणे तज्ञांकडून समजावून घेणे गरजेचे झालेले आहे. त्याचप्रमाणे रात्रीची नियमित झोप ,योग्य व्यायाम आणि बरोबरिने पोषक आहार ठरवून घेणे हे आज आपल्या समोरचे एक मोठे आव्हान आहे.

त्यासाठी आपले वेगवेगळे ग्रुप्स करून या विषयावर चर्चा करणे, परस्परांना आहाराची आठवण देणे. दोन-तीन पदार्थांचा एकत्र वापर करून” वन डिश मील “हाही एक चांगला पर्याय आहे. यासाठी फक्त थोडसं नियोजन गरजेच आहे .त्याप्रमाणे जर खरेदी केली आणि आठवड्याचा मेनू ठरवला, चार पदार्थ करत न बसता एकत्र करून त्यांचे फायदे मात्र मिळवता येतील. यासाठी मिश्र पीठ दळून आणणे, वेगवेगळ्या भाज्या घालून पराठे, पॅटीस, कटलेट, भाज्या घालून इडली , मोड आलेल्या गव्हाची खीर, कडधान्याची भेळ यासारखे पदार्थ आपली कल्पकता वापरून करणे आणि आपल्या ग्रुप वर शेअर करणे ही एक चांगली ऍक्टिव्हिटी होऊ शकते. यामुळे आपली पुढची पिढी सुद्धा आहाराबाबत जास्त सजग होईल.

मानसी फडके
एम.ए.मराठी.
एम एस काऊंसेलिग सायको थेरपी.
एम ए सायकॉलॉजी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER