खाऊ आनंदे !

Eat happily! On Nutrition week

सप्टेंबरचा पहिला आठवडा हा आपल्या पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) ‘पोषण सप्ताह’ म्हणून जाहीर केला. खरं तर आज सगळे जण ‘हेल्थ कॉन्शस’ झाले आहेत . वेगवेगळ्या उपायांचा अवलंब ते करताना दिसतात. कुणी म्हणतं माझं दीक्षित डायट चालू आहे. कोणी म्हणतं माझं दामले डायट! कुणाला मात्र खाऊनपिऊन सुखी ठेवणारे ऋजुता दिवेकर डायट फॉलो करायला आवडते. जिम , फिरणे, डायट चालू असतं . पण तरीही प्रॉब्लेम काही सुटत नाहीत ! म्हणजे वजन कमी होत नाही. परिस्थिती मात्र खाऊन-पिऊन उपाशी असल्यासारखी असते हे विशेष ! आज जास्तीत जास्त लोकांशी बोलताना लक्षात येतं , कॅल्शियम , हिमोग्लोबीन, डी व्हिटॅमिन यांची कमतरता भरपूर जणांमध्ये असते आणि हे सर्व जण दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील नसतात, तर सुखवस्तू घरातूनच ही कमतरता जास्त जाणवू लागली आहे. कारण निश्चितपणे आपली लाईफस्टाईल!

यासंबंधी खोलात जाऊन विचार करायचा तर अगदी अलीकडच्या ‘ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्टनुसार’ काय परिस्थिती आहे ते बघायला लागेल. २०१२ ला WHO मधील एका असेंबलीने सहा पोषणविषयक ध्येयांची आखणी २०१५ पर्यंत पूर्ण करण्यासाठी केली होती. त्यातील सहा मुद्दे असे होते :

 • पाच वर्षांखालील मुलांची वाढ खुंटण्याबाबतचे प्रमाण ४० % कमी करणे.
 • १९ ते ४९ या वयोगटातील स्त्रियांमधील अनेमियाचे प्रमाण ५० % कमी करणे.
 • बरीच मुले कमी वजनाची जन्माला येतात.त्यांचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटवणे.
 • त्याचप्रमाणे बालवयामध्ये बऱ्याच मुलांची वजने प्रमाणाबाहेर जास्त आहेत, त्याचे प्रमाण वाढवू न देणे.
 • मुलाच्या वयाच्या सहा महिन्यापर्यंत स्तनपान आवश्यक आहे. त्याचे प्रमाण ५० टक्के प्रमाणापर्यंत वाढवणे.
 • शरीराची ताकद आणि उत्साह कमी असण्याचे प्रमाण जास्त आहे. ते घटवणे किंवा कमीत कमी कायम ठेवणे.

‘ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट’नुसार ठरवलेले टार्गेट पूर्ण न करू शकलेल्या ८८ देशांपैकी भारत एक आहे. ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. वरील सहा मुद्द्यांपैकी चार टार्गेट्स पूर्ण होऊ शकलेली नाही. * पाच वर्षांखालील मुलांची वाढ खुरंटणे…

 • स्त्रियांमधील अशक्तपणा
 • बालपणातील जास्त वजन
 • विशेष स्तनपानाची गरज

जादा वजन आणि लठ्ठपणाचे प्रमाण सतत वाढते आहे. २१.६ टक्के महिला तर १७.८ टक्के पुरुष वाढत्या वजनाने ग्रस्त आहेत. पुरुषांच्या तुलनेत प्रौढ महिलांचे लठ्ठपणाचे प्रमाण जास्त आहे. तर १९ ते ४९ वयोगटातील स्त्रियांमधील अशक्तपणाचे प्रमाण अक्षरशः २:१ याप्रमाणे आहे. कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही २०१७ च्या अभ्यासानुसार ६८ % बालमृत्यू हे पाच वर्षांखालील आणि कुपोषणामुळे झालेले होते.

या विश्लेषणवरून स्त्रियांचे आरोग्याकडील दुर्लक्ष हा विशेष विचार करण्याचा मुद्दा ठरणार आहे. त्यांच्यातील रक्ताची कमतरता आणि इतर डेफिशियन्सी याच पुढे त्यांच्या मुलांना पण भोगाव्या लागतात. कुपोषणाचे साधारण चार प्रकार म्हणता येतात.

 • अंडर न्यूट्रिशियन : या प्रकारामध्ये शरीराची ताकद किंवा उत्साह कमी जाणवणे.आणि वाढ खुरंटणे. म्हणजेच wasting म्हणजे उंचीच्या तुलनेत वजन नसणे. खायला-प्यायला कमी पडणे ,मिळू न शकणे किंवा मग इन्फेक्शनसारखे ‘डायरिया’ वगैरे आजार याचा यात समावेश होतो. यामुळे मुलांमधील death rate वाढू शकतो. पण ट्रीटमेंट शक्य असते. Stunning म्हणजे वयाच्या हिशेबाने उंची नसणे, वाढ थांबणे. यासाठी साधारण जुनाट कुपोषण कारण ठरते. हे सहसा संबंधित सामाजिक आणि आर्थिक स्थिती, आईकडून होणारी पोषणाची कमतरता, सततची आजारपणे , अयोग्य स्तनपान किंवा बालपणातील काळजी घेतली न जाणे हे याला कारण ठरते .याचा शारीरिक आणि आकलन शक्तीवर परिणाम होऊ शकतो.
 • अंडरवेट : म्हणजे वयाच्या हिशेबाने कमी वजन. मिनरल्स आणि विटामिन्स यांचे खाण्यातले कमी प्रमाण, enzaims, हार्मोन्स कमी पडणे . त्यामुळे वाढ आणि विकासावर होणारा परिणाम.
 • ओव्हरवेट किंवा ओबेसिटी : हा सध्या जाणवणारा गंभीर प्रश्न आहे. केवळ प्रौढ लोकांमध्येच नाही तर लहान मुलांमध्ये हे प्रमाण प्रचंड वाढते आहे. बीएमआयवरून (BMI : बॉडी मास इंडेक्स) ओबेसिटी ठरते. व्यक्तीचे किलोग्रॅममधील वजन, त्याला त्या व्यक्तीच्या मीटरमधील उंचीच्या वर्गाने भागले असता त्या व्यक्तीचा, बीएमआय मिळतो. kg/m squar. फार जास्त एनर्जी देणारे अन्न घेऊन त्याचा विनियोग मात्र जास्त प्रमाणात होत नाही आणि साखर आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असून शारीरिक हालचाली जर कमी असतील तर BMI वाढतो.

याचे परिणाम दिसू लागले आहेत. ते म्हणजे फार लहान वयातच बीपी, डायबेटिस ,थायरॉईड, हार्ट प्रॉब्लेममधील वाढ ! वरील आकडेवारी बघताना मन अस्वस्थ होतं. कायम असलेला आर्थिक स्थितीमधील असमतोल आणि त्याबरोबरच असलेले अज्ञान, रूढी, परंपरा हे एकीकडे. आणि एकीकडे असणारी प्रचंड सुबत्ता ,पैशाच्या मागे पळण्याचा अविरत ध्यास, पाश्चिमात्यांचे अनुकरण करत जाणारी आपली जीवनशैली ,आणि ज्ञानाचा वापर असूनही न करणे हे , याला जबाबदार आहे, असं दिसतं. “कळतं पण वळत नाही” अशी स्थिती बरेच ठिकाणी आहे.

कारण काही गोष्टींचा वापर करायचा तर कुठे तरी होणारे कष्ट करायची आम्हा कुणाला सवयच नाही राहिलेली !कुपोषणामुळे होणारे मृत्यू, आजार ते तर दिसतच आहे; पण त्याबरोबरच ‘ओबेसिटी’च्या वाढत्या प्रमाणाची पण आपल्याला आता झळ पोचायला लागली आहे. आहारशास्त्र हे केवळ आजार बरे करण्यासाठी नसून आपण फिट कसे राहू ? तंदुरुस्त कसे राहू? यासाठी पण आहे. ‘सिर सलामत तो पगडी पचास’ अशी एक म्हण आहे. म्हणूनच शारीरिक तंदुरुस्तीचा परिणाम मानसिक तंदुरुस्तीवरही होत असतो. हेही लक्षात घ्यायला हवं.

आपल्याला फक्त आयुष्याची लांबी नकोय तर खोलीही हवी आहे. नुसतं मिळालेलं आयुष्य रुटूखुटू करत रडतभेकत घालवण्याऐवजी ते आनंद उपभोगत, समृद्धपणे जर घालवता यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्यावे लागेल ते आपल्या खाण्याकडे , आहाराकडे ! माझी एक मैत्रीण नेहमी म्हणते, “सगळा आटापिटा कशासाठी, तर खाण्यासाठी !” भिशीसाठी एकत्र आल्यावर खाना तो बनताही है ! खरंच आयुष्यभराची धडपड, पळापळ कशासाठी असते हो ? म्हणूनच या पोषण सप्ताहाचा फायदा नक्कीच उठवायला पाहिजे.

मानसी फडके
एम.ए.मराठी.
एम एस काऊंसेलिग सायको थेरपी.
एम ए सायकॉलॉजी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER