मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ला विलासराव देशमुख यांचे नाव; अजित पवार यांचा पुढाकार

Vilasrao Deshmukh - Ajit Pawar

मुंबई : मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गाला (इस्टर्न फ्री वे) माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबत कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी नगरविकास विभागाला केली. महसूलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

यावेळी अजित पवार म्हणाले, दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून, मुंबईच्या विकासाला दिशा दिली. ‘इस्टर्न फ्री वे’च्या उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. त्यामुळे ‘इस्टर्न फ्री वे’ला त्यांचे नाव देण्यात यावे.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या ‘शिवशाही’ बसगाड्यांचे होणारे अपघात व नागरिकांमध्ये त्याबद्दल असलेल्या नाराजीची दखल यावेळी अजित पवार यांनी घेतली. यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.