कोरोनाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू , अंशतः लॉकडाऊन प्रभावी नाही : आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांचे वक्तव्य

मुंबई : देशात कोरोनाचे थैमान सुरुच आहे . अशात अनेक राज्यांनी नाईट कर्फ्यू तसेच आठवड्यातून दोन दिवस लॉकडाऊन असे वेगवेगळे निर्बंध घातले आहेत.

महाराष्ट्रातही रविवारपासून नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यात या सगळ्याचा खरच कितपत फायदा आहे? याचं उत्तर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Harsh Vardhan) यांनी दिलं आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू आणि दोन दिवसाचं लॉकडाऊन जास्त उपयोगाचं नाही. त्यांचं असंही म्हणणं आहे, की लसीकरणामुळेच कोरोनाची दुसरी लाट थांबवता येऊ शकते. देशभरातून सध्या कोरोनाचे अनेक नवे रुग्ण समोर येत आहेत. शुक्रवारीदेखील यात ६० हजार नवीन रुग्णांची भर पडली आहे.
हर्षवर्धन पुढे बोलताना म्हणाले, की सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून आपण कोरोनाचा प्रसार रोखू शकतो. मात्र, आठवड्याच्या शेवटी लावलं जाणार लॉकडाऊन तसंच नाईट कर्फ्यू याचा तितका फायदा होणार नाही. ते पुढे म्हणाले, की सरकार लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याचा विचार करत आहे. लसीकरणासाठीची वयोमर्यादाही कमी करण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले, की सरकार आता कोरोनासोबत लढा देण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तयार आहे. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, देशात सध्या सहा लसींवर काम सुरु आहे. अशात देशाला लवकरच आणखी लसी उपलब्ध होतील, अशी आशा आहे. सध्या भारतात दोन लसी उपलब्ध आहेत.

हर्षवर्धन म्हणाले, की कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आणि प्रतिरोधक आहेत. देशात वापरल्या जाणाऱ्या या दोन्ही लशींबाबत कोणतीही चिंता नाही. ते म्हणाले, की भारतात लसीकरणानंतर होणाऱ्या प्रभावाबाबत सर्व प्रकरणांची पाहणी मजबूत प्रणालीद्वारे केली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER