राज्यसेवा परीक्षेच्या निकालाएवढीच उदयराजेंना भेटण्याची उत्सुकता

Udyan Raje Bhosle

सातारा : जेवढी उत्सुकता राज्यसेवाच्या परीक्षांमध्ये पास होण्यासाठी लागली होती तेवढीच उत्सुकता खासदार उदयनराजेंना भेटण्याअगोदर लागली होती, अशी प्रतिक्रीया राज्यसेवा परीक्षेत यश मिळविलेल्या नूतन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे राज्यसेवा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या ३० विद्यार्थ्यांचा आज खासदर उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राज्यसेवा परीक्षांचे नुकतेच निकाल जाहीर झाले. या परीक्षांमध्ये सातारा जिल्हयातील ३० जणांनी यश प्राप्त करून साताऱ्याचे नाव राज्यभरात गाजवले आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले मित्र समूहाच्यावतीने ३० यशस्वी विद्यार्थ्याचा यावेळी सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी राज्यसेवा परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या प्रसाद चौगुलेचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, लाखो परिक्षार्थीमधून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत तुमची निवड झाली आहे. ही झालेली निवड म्हणजे मिळालेले यश, तुमच्या पालकांची पुण्याई आणि समाजाचे नशिब आहे, जनतेसह तुम्हा सर्वांना जलमंदिर सदैव खुले आहे. पुढील प्रशासकीय नोकरीच्या माध्यमातुन जनतेची अविरत सेवा करावी, तुम्हाला काहीही समस्या-प्रश्न निर्माण झाले तर आम्ही सदैव सहकार्याकरीता तत्पर आहोत. जलमंदिर हे सर्व जनतेचे घर आहे. असे उदयनराजे भोसले म्हणाले.

यावेळी सत्कारमुर्तीपैकी, राज्यात पहिला आलेले प्रसाद चौगुलु, तसेच प्रगती कटटे, चैतन्य कदम, श्वेता खाडे, राहुल गुरव, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणारा सत्कार हा आमच्या सर्वांचा फार मोठा सन्मान आहे. या सत्काराच्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा सुयोग जुळून आला, हा दिवस नेहमीच स्मरणात राहील, सत्काराबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी सर्व यशस्वी व्यक्तींना शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, सातारी कंदी पेढे आणि एक झाडाचे रोप प्रदान करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि मान्यवरांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आदर सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सभापती सुनील काटकर उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, डि.जी.बनकर, संग्राम बर्गे, शिरिष चिटणीस, अमित कुलकर्णी, पंकज चव्हाण, विनित पाटील व मित्रसमुहाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER