शौचालयाच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

arman-jabir-khan

सवंगड्यांसोबत खेळत असताना घरासमोरील इमारतीच्या शौचालयाच्या उघड्या टाकीत पडून एका साडेचार वर्षीय लहानग्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहापूर जवळच्या वाफे गावात शुक्रवारी घडली. याप्रकरणी शहापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अरमान जाबीर खान असे मृत बालकाचे नाव असून वाफे गावातील गोविंदनगर येथे ही घटना घडली. गोविंदनगर येथील सुरेश खारीक यांच्या चाळीत राहणाऱ्या जाबीर खान यांचा साडेचार वर्षाचा मुलगा अरमान घरासमोरील समर्थकृपा अपार्टमेंट या इमारतीसमोर खेळत होता. दरम्यान इमारतीच्या शौचालयाच्या दोन्ही टाक्या उघड्याच आहेत. अरमान मित्रांबरोबर खेळत असताना त्या उघड्या शौचालयाच्या टाकीत पडला.

टाकीत पडल्यानंतर त्याच्यासोबत खेळणाऱ्या काही मुलांनी याची माहिती अरमानच्या घरी कळवली. त्यानंतर त्याला दुर्गंधीयुक्त टाकीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर उपचारांसाठी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. अशा घटना पालकाच्या दुर्लक्षाने घडतात. यामुळे पालकांनी मुलावर लक्ष द्यावे असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.