
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात डी. वाय. पाटील संस्थेचे फार मोठे नाव आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन भारताची नवी पिढी चांगली घडवण्यात या संस्थेचा फार मोठा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याच संस्थेने साऊथ आणि बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेता आर. माधवनला (R. Madhvan) डी लिट ही मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. शूटिंगच्या कामात बिझी असतानाही बुधवारी आर. माधवन या पुरस्कार प्रदान सोहोळ्यासाठी खास कोल्हापुरला आला होता.
डी. वाय पाटील संस्थेने कोल्हापूर येथे भव्य पुरस्कार प्रदान सोहोळ्याचे आयोजन केले होते. आर. माधवन गेल्या दोन दशकांपासून साऊथ आणि हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आलेला आहे. सध्या तो प्रख्यात अंतराळ वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावरील बायोपिक ‘रॉकेटरी’ सिनेमाच्या निर्मितीत व्यस्त आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तो प्रथमच दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही उतरत आहे. या सिनेमाचे स्पेशल इफेक्ट्स हॉलिवूडच्या सुपरहिट ‘अवतार’ सिनेमाचे स्पेशल इफेक्ट्स तयार केलेली टीम तयार करीत आहे. माधवनने 2001 मध्ये बॉलीवूडमध्ये ‘रहना है तेरे दिल में’ सिनेमातून प्रवेश केला होता. या सिनेमात त्याची नायिका होती दिया मिर्झा. (Dia Mirza) दियाने दोन दिवसांपूर्वीच दुसरे लग्न केले आहे. माधवनचा मणिरत्नम (Maniratnam) दिग्दर्शित तामिळ सिनेमा अलायपायुथे’ गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता तसेच आर. माधवनची वेब सीरीज रिलीज झाली होती आणि ती प्रचंड लोकप्रियही झाली होती. माधवन हिंदी, कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी सिनेमात सतत काम करीत आहे. आर. माधवन भारतातील असा एकमेव कलाकार आहे जो गेल्या दोन दशकांपासून विविध भाषांमधील प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आला आहे. माधवनची पॅन इंडिया लोकप्रियता आणि त्याचे कोल्हापूरशी नाते असल्यानेच डी. वाय. पाटील समूहाने मानद डॉक्टरेटसाठी त्याची निवड केली.
कोल्हापुरमध्ये झालेल्या या पुरस्कार प्रदान सोहोळ्याला माधवनच्या इंजीनियरिंगच्या दिवसातील त्याचे मित्र त्याला शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापुरला आले होते. फार कमी लोकांना ठाऊक आहे की, माधवनने त्याचे माध्यमिक आणि कॉलेजचे शिक्षण कोल्हापुरमध्येच घेतलेले आहे. कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये असतानाच भारताचा सांस्कृतिक प्रतिनिधि म्हणून त्याला कॅनडाला जाण्याची संधी मिळाली होती. त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि तेथे तो जवळ जवळ एक वर्ष होता. माधवन सध्या मुंबईत टी सीरीज द्वारा निर्मित सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला