युपीएच्या काळात 6 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले पण आम्ही राजकारण केलं नाही- काँग्रेस

नवी दिल्ली :  युपीए सरकारच्या काळातही तब्बल 6 वेळा सर्जिकल स्ट्राईक झालं होतं. पण त्याचा वापर आम्ही मतांसाठी केला नाही, असं म्हणत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

मोदी सरकार आर्थिक स्तरावर अपयशी ठरलं आहे त्यांच हे अपयश लपवण्यासाठी ते लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत असून ही लाजिरवाणी बाब आहे, असे मनमोहन सिंह म्हणाले.

काँग्रेस सरकारने 26/11च्या हल्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली नाही, असा आरोप भाजपने केला होता. या आरोपाशी मी सहमत नाही, असं मनमोहन सिंह म्हणाले.

ही बातमी पण वाचा : त्यापेक्षा मी मरण पत्करेन – प्रियांका गांधी

प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षा असते. आम्ही दहशदवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणण्याची भूमिका घेतली होती, असंही मनमोहन सिंह यांनी सांगितलं आहे.

तर, डॉ.मनमोहन सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईक संदर्भात केलेल्या दाव्यानंतर काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या 6 सर्जिकल स्ट्राईकची यादीच जाहीर केली आहे. यातील पहिला सर्जिकल स्ट्राईक 19 जानेवारी 2008रोजी, दुसरा 30 ऑगस्ट-1 सप्टेंबर, तिसरा 6 जानेवारी 2013, चौथा 27-28 जुलै 2013, पाचवा 6 ऑगस्ट 2013 आणि सहावा 23 डिसेंबर 2013 रोजी करण्यात आल्याचे म्हटले आहे.

याआधी निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक प्रचार सभेत युपीएच्या कार्यकाळात अनेक सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सांगितले होते. पण माजी पंतप्रधान सिंग हे प्रथमच सर्जिकल स्ट्राईक संदर्भात बोलले.