भाजपाच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास गेली – नितीन राऊत

Dr. Nitin Raut

मुंबई :  “कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र महावितरणला सर्वांत मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखविल्याने व वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे. भाजपा सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास पोहचली.” असा आरोप राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.

राज्यातील वीज ग्राहकांना गेल्या काही महिन्यांपासून येणाऱ्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपाने महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ग्राहकांना वाढीव वीज बिलात काहीही दिलासा मिळणार नाही असे जाहीर केले. मीटर रीडिंगप्रमाणे आलेली बिलं  ग्राहकांनी भरलीच पाहिजे, असे राऊत म्हणाले. आता, “कोरोना काळात वीज बिले भरली न गेल्याने महावितरणची थकबाकी नऊ  हजार कोटींनी वाढून ऑक्टोबरमध्ये ५९,१०२ कोटींवर पोहचली.

मार्च २० ला घरगुती ग्राहकांकडे असलेली १ हजार ३७४ कोटींची थकबाकी ४ हजार८२४ कोटींवर पोहचली. वाणिज्य ग्राहकांची ८७९ वरून १ हजार २४१ कोटींवर तर औद्योगिकची ४७२ वरून ९८२ कोटींवर पोहचली.” अशी  माहिती नितीन राऊत यांनी दिली. बिलाचे हप्ते पाडून देण्यात आले आहेत. पूर्ण बिल एकदम भरणाऱ्यांना सवलतही दिली आहे, असे राऊत यांनी या आधी म्हटले आहे. ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून मी पूर्ण प्रयत्न केले. मात्र केंद्र सरकारने यात मदत केली नाही. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता सवलत देण्याचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटींच्या तोट्यात आहे. आम्ही कर्ज काढू शकत नाही, असे ते म्हणालेत.

विश्वासघात – फडणवीस

कोरोना काळातील वीज बिलांमध्ये सवलत देण्याचे जाहीर करून घूमजाव करणे, हा लाखो ग्राहकांचा विश्वासघात आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एसटी महामंडळाप्रमाणेच महावितरणलाही राज्य सरकारने न्याय द्यावा आणि किमान पाच हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER