अखेर डूप्लांटीसने पोलवॉल्टचा आऊटडोअरमध्येही केला विश्वविक्रम

स्वीडनच्या (Sweden) अवघ्या 20 वर्षांच्या अर्मांड ‘मोंडो’ डूप्लांटीस (Armand mondo Duplantis) याने पोल व्हॅल्टमध्ये (Pole Vault) नवा विश्वविक्रम (World Record) नोंदवला आहे. त्याने गुरुवारी रोम डायमंड लीग स्पर्धेत 6.15 मीटर उंच उडी मारली. असे करताना त्याने रशियाच्या सर्जी बुबकाचा आउटडोअर (Outdoor) पोल व्हॅल्टचा 26 वर्षांपासूनचा विक्रम मोडला.

आपल्या दुसऱ्या प्रयत्नात मोंडोने हे विक्रमी यश मिळवले. सर्जी बुबका यांनी जुलै 1994 मध्ये सेस्रियरे येथील स्पर्धेत 6.14 मीटरचा विक्रम नोंदवला होता.

डूप्लांटीस हा गेल्या वर्षीच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेपासून अपराजित आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत मात्र तो अमेरिकेच्या सॅम केंड्रीक्सच्या मागे दुसऱ्या स्थानी राहिला होता. यंदा फेब्रुवारीत त्याने लंडन ऑलिम्पिक 2012 चा विजेता रेनॉ लव्हीलेनीचा 6.17 मीटरचा इनडोअर विश्वविक्रम मागे टाकला आणि टोरुन पोलंड येथे 6.18 मीटरचा नवा इनडोअर विश्वविक्रम नोंदवला. आता त्याने आउटडोअरचाही विक्रम मोडला आणि ज्या सहजतेने त्याने हा विक्रम केला ते पाहता नजिकच्या भविष्यात 6.20 मीटरचाही पल्ला तो गाठू शकतो असे दिसते. 6.15 मीटरच्या अंतरासाठी त्याने 14 व्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे.

या कामगिरीनंतर तो म्हणाला की, शेवटी विश्वविक्रम झाला तर…फारच छान! 6.15 मीटरचा पल्ला ओलांडायचा माझी फार इच्छा होती. सर्वचजण या अंतराची चर्चा करत होते. माझ्या खांद्यावर त्याचे फारच ओझे होते. लोकांनी प्रश्न विचारणे थांबवावे यासाठी मला हा विक्रम करणे आवश्यक होते. म्हणून मी हा विक्रम केला तो आनंदापेक्षा दिलासा जास्त होता.

गेल्याच महिन्यात त्याने लुसान येथे 6.15 मीटरचा प्रयत्न केला होता पण पुरेशा प्रकाशाअभावी त्याला त्यावेळी प्रयत्न सोडून द्यावे लागलै होते. त्यावेळी 6.07 मीटरचे अंतर पार करुन त्याने आऊटडोअरमधील दुसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. आता केवळ 20 वर्षे वयातच पोल व्हॉल्टचे इनडोअर व आउटडोअर दोन्ही विक्रम डूप्लांटिसच्या नावावर आहेत. मोंडोची आई हेलेना हेडलुंड डूप्लांटीस ह्यासुध्दा हेप्टॕथलॉनच्या खेळाडू तर वडील जेफ हे स्वतः पोलवॉल्टपटूच होते. या विश्वविक्रमावेळी दुर्देवाने दोघांपैकी कुणीही उपस्थित नव्हते.एरवी या दोघांपैकी एक तरी उपस्थित असतोच. यामुळे विश्वविक्रम करुनही डूप्लांटीस म्हणावा तेवढा आनंदी नव्हता. एक योगायोग म्हणजे स्वीडनमध्ये ‘मोंडो’ शब्दाचा अर्थ दुनीया असा होतो आणि आता त्याच नावाच्या या खेळाडूने जग जिंकले आहे.

या विक्रमी कामगिरीसाठी माजी आॕलिम्पिक विजेत्या रेनॉ लॕव्हिलेनी यांचे मार्गदर्शन घेतल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे रेनॉ स्वतः 5.80 मीटर पार करु न शकल्याने बाद झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER