पोल व्हॉल्टमध्ये 26 वर्षात ‘हे’ प्रथमच घडले…

Duplantis

जे ऍथलेटिक्सची खबरबात ठेवतात त्यांना स्वीडनच्या अर्मांड ‘मोंडो’ डूप्लांटीस (Mondo Duplantis) हे नाव नवीन नाही. पोल व्हॉल्ट (Pole Vault) अर्थात बांबू उडीमध्ये सर्जी बुबकानंतर (Sergey Bubka) ह्याचेच नाव आहे. ह्या गड्याने गेल्या 26 वर्षात झाली नाही अशी कामगिरी बुधवारी लोसान ( Lausanne) येथे करुन दाखवली. वांडा डायमंड लीग स्पर्धेत त्याने 6.07 मीटर (20 फूटापेक्षाही उंच) उंच उडी मारली. आउटडोअर पोल व्हॉल्टमध्ये गेल्या 26 वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

डूप्लांटीसने ही विक्रमी कामगिरी केली याचे श्रेय त्याला तोडीसतोड स्पर्धा देणाऱ्या अमेरिकेच्या सॅम केंड्रिक्सलाही (Sam Kendricks) द्यायला पाहिजे कारण या दोघांनी आपली कामगिरी आणि जिंकण्याचा बार एवढा उंचावत नेला की गेल्या 26 वर्षात जी उंची कुणी गाठली नव्हती ती गाठली गेली. दुर्देवाने संध्याकाळ झाली, स्वीत्झर्लंडच्या या शहरात अंधार पडायला लागला म्हणून मर्यादा आल्या नाहीतर कदाचित आणखी जास्त उंची यांनी गाठली असती.

डूप्लांटीसने 6.07 मीटरचे लक्ष्य निश्चित केल्यावर पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले, त्याआधी 6.15 मीटरचा प्रयत्न त्याने करुन पाहिला होत. केंड्रीक्सला 6.02 मीटरच्या कामगीरीवर त्याला समाधान मानावे लागले.

20 वर्षीय डूप्लांटीसने यंदाच ग्लासगो येथील स्पर्धेत इनडोअर पोलव्हॉल्टचा विश्वविक्रम 6.18 मीटरचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. त्यानंतर आता आऊटडोअरमध्येही त्याने विक्रमी कामगिरी केली आहे पण अजुनही सर्जी बूबकाचा 31 जुलै 1994 चा 6.14 मीटरचा विक्रम त्याला गाठता आलेला नाही.

दोन वेळच्या विश्वविजेत्या केंड्रिक्सने 5.32 मीटरपासून सुरुवात केली. त्याला मोंडोने 5.62 मीटरसह उत्तर दिले. 2016 चा आॕलिम्पिक विजेता थिएगो ब्राझ व 2012 चा आॕलिम्पिक विजेता रेनाॕ लाव्हलेनी यांनी 5.72 मीटर पार केले पण 5.82 मीटरवर अपयशी ठरल्याने हे बाद झाले. त्यानंतर डूप्लांटीस व केंड्रिक्स यांचे द्वंद्व सुरू झाले. दोघांनीही 5.87, 5.92 व 5.97 मीटरची उंची पार केली. त्यानंतर बार सहा मीटरच्या वर 6.02 मीटरवर लावण्यात आला आणि दोघांनीही ती उंचीसुध्दा सर केली. पोल व्हॉल्टच्या इतिहासातपहिल्यांदाच दोन स्पर्धकांनी 6.02 मीटरची उंची पार केली. यावेळेपर्यंत केंड्रीक्सने सलग सातदा पहिल्याच प्रयत्नात बार पार केलेला होता. मात्र 6.07 मीटरवर तो अडखडला पण डूप्लांटीसने ही उंचीसुध्दा यशस्वीरित्या पार केली. एव्हाना अंधार पडू लागला होता.केंड्रीक्सने 6.07 मीटरवर आणखी दोन प्रयत्न केले पण यश आले नाही. आयोजकांनी स्पर्धास्थळी प्रकाशव्यवस्थेचे प्रयत्न केले यादरम्यान बार 6.15 मीटरवर लावला गेला. डूप्लांटीसने एक प्रयत्न केला पण नंतर नाद सोडून दिला.

एवढ्या उंचीसाठी उजेड पुरेसा नव्हता आणि तरीही प्रयात्न करणे धोक्याचे होते. सॕम हा एक उत्तम स्पर्धक आहे. आम्ही दोघांनी स्पर्धा करुन एकमेकाची सर्वोत्तम कामगिरी करुन घातली आणि निकाल तुमच्यासमोर आहे असे डूप्लांटीसने या यशानंतर म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER