तुकोजीराव होळकरांमुळे संपूर्ण जगात पोहचलं केळूसरांनी लिहलेलं शिवचरित्र.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं दैवत. त्यांच्यावर आज हजारो पुस्तक वाचायला मिळतात. पण एक काळ असा होता की, शिवाजी महाराजांचं पहिलं सविस्तर चरित्र लिहणाऱ्या व्यक्तीवर कर्जबाजारी होऊन घरदार विकण्याची वेळ आली होती. आणि या व्यक्तीची मदत एका होळकर राजाने केली होती. आणि प्रकाशनाची सारी जबाबदारी घेवून जगभराच्या ग्रंथालयांना शिवचरित्राच्या मोफत प्रति भेट दिल्या.

कृष्णाजी अर्जून केळूसकर डॉ.आंबेडकरांचे शिक्षक आणि महात्मा फुलेंचे शिष्य. महात्मा जोतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहला. पण शिवाजी महाजांच्या चरित्रावर म्हणावे तसे सविस्तर लिखाण करण्यात आले नव्हते. ही बाब लक्षात घेतल्यानंतर केळूसकरांनी शिवचरित्र लिहण्याचे शिवधनूष्य पेलले. १९०३ साली त्यांनी मराठी शिवचरित्र लिहायला घेतले आणि १९०७ ला ते पुर्णही झाले. होहो म्हणता साऱ्या प्रति खपल्या. चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर मराठीतील शिवचरित्र इंग्रजीत लिहावं आणि जगभरात शिवछत्रपतींच्या कार्याचा प्रसार करावा असा विचार त्यांच्या मनात आला.

केळूसकर मध्यमवर्गीय शिक्षक माणूस. त्यांनी इंग्रजीत शिवचरित्र प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला खरा पण वाट म्हणावी तितकी सोपी नव्हती. परिणामी त्यांच्यावर त्या काळात २५ हजार रुपयांचे कर्ज झाले. आजच्या काळात ही रक्कम कोट्यावधी रुपयांच्या घरात जाते.

इंग्रजांना शिवाजी महाराज महाराष्ट्रापुरते, मराठीपुरेत मर्यादीत हवे होते. त्यांचे चरित्र इंग्रजीत प्रकाशित झाले तर देशभर स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा विचार जाईल, जनता बंड करुन उठेल, याची त्यांना खात्री होती. म्हणून इंग्रजांनी मदत केली नाही.

भारतीयांनी सुद्धा शिवचरित्र खरेदी केलं नाही. डोक्यावर ग्रंथांचा गठ्ठा घेवून दोरदारी जावून ग्रंथ विकायचे. त्यांच्या सोबत डोक्यावर शिवचरित्राचा गठ्ठा घेवून एक विद्यार्थीही असायचा. ज्याने नंतरच्या काळात शिवछत्रपतींचा विचार मनामनात उतरवला. पुढे जावून तो विद्यार्थी घटनाकार झाला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

केळूसकरांनी शिवचरित्र लिहलं पण ते खरेदी करायला कोणीच येईना. प्रसंगी बँकेची जप्ती घरावर आली. त्यांनी राज्याश्रय घेण्याचं ठरवलं.

राजश्री शाहूमहाराजांच्या दरबारी जाऊन त्यांनी परिस्थीती सांगितली. शाहू महाराजांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. काही दिवसांनी परत भेटण्याचे सांगून निश्चीत मदत देवू असं अश्वासन दिलं. पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. ज्या दिवशी शाहू महाराज मदत देणार होत्या त्याआधीच त्यांचे निधन झाले. केळूसरकरांकडे हताश होण्याच्या पलिकडं दुसरा पर्यायच नव्हता. पण त्यांन हार मानली नाही. बडोद्याला गायकवाडांच्या दरबारी त्यांनी मदत मागितली.

सयाजीराव गायकवाड महाराजांनी मदतीचे आश्वासन दिले. ते इंग्लंडला महत्त्वाच्या कामासाठी निघाले होते. ते परतले की नक्की मदत करु असे त्यांनी सांगितले. आणि गडबडीत ते इंग्लंडला गेले. दुर्दैवाने सयाजीराव गायकवाडांचे इंग्लडमध्ये निधन झाले. केळूसकरांसाठी हा मोठा धक्का होता. सगळ्याच वाटा बंद झाल्या की काय? असा विचार त्यांच्या मनात येवू लागला. केळूसकर प्रचंड दु:खी होते. पण निराशेतूनच प्रकाशाची वाट दिसत असते. या देशात आणखी एक घराणं होतं जिथे लोककार्याची मोठी परंपरा होती. ते म्हणजे इंदौरचं होळकर घराणं.

जनसेवेतून देवत्व प्राप्त करणाऱ्या पुण्यश्लोक आहिल्यादेवींच इंदौर. केळूसककारंनी शेवटचा पर्यांय म्हणून इंदौर गाठलं. सवाई श्रीमंत तुकोजीराव होळकर इंदौर संस्थानचे अधिपती.

केळुसकर गुरूजींनी आपली गत होळकरांना सांगितली.

तुकोजीराव म्हणाले, “शिवछत्रपती आमचेही दैवत, त्यांच्या दिल्या प्रेरणेने हे राज्य उभे आहे. आम्ही शक्य ती सारी मदत करु. तुम्ही शिवचरित्र इंग्रजीतून प्रकाशीत करुन सबंध जगाला शिवाजी महाराज सांगण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही सारी मदत करु.”

त्यांनी तडक निर्णय घेत त्याच ठिकाणी रोख २५ हजार रुपये केळूसकरांच्या हातात दिले. आणि त्या रकमेला वाटेत लुटपाट होवू नये म्हणून सुखरुप महाराष्ट्रापर्यंत पोहचवण्याची तजवीज केली. तुकोजीरावांनी पैसे दिले केळूसकरांनी बँकेचे कर्ज फेडलं. तुकोजीरावांनी शिवचरित्राच्या प्रति जगभरातल्या वाचनालायांना भेट दिल्या. जगभरात शिवाजी महाराज वाचले जावू लागले. आज संपूर्ण जग शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेत आहे.. त्यात फुले, शाहू, आंबेडकर, आणि केळूसकरांइतकाच वाटा होळकरांचाही आहे.