‘या’ कारणाने शरद पवार यांनी एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश तूर्त थांबवला?

Sharad Pawar & Eknath Khadse

मुंबई : १०५ आमदार निवडून येऊनसुद्धा विरोधी पक्ष म्हणून समाधान मानाव्या लागणाऱ्या भाजपला (BJP) मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर भाजपचे (BJP) अन्य काही नेतेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना  उधाण आलं आहे. या बैठकीत खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना, या बैठकीत खडसेंबाबत कुठलीही चर्चा न झाल्याचं सांगितलं. जयंत पाटील म्हणाले, आजच्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्याविषयीची कुठलीही चर्चा नाही. जळगाव जल सिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली. एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने याबाबत विचार करावा. राजकारणात जर-तरला फार महत्त्व नसते, असं म्हणत उत्तर देणं टाळलं. दरम्यान, या बैठकीत खडसेंबाबत चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं असलं तरी, सूत्रांच्या माहितीनुसार खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

खुद्द शरद पवार हे खडसेंना पक्षात घेण्यास अनुकूल आहेत. मात्र त्यांना पक्षात घेतले तर कोणती जबाबदारी द्यायची याबाबत संभ्रमात आहेत. त्यामुळे तूर्त तरी त्यांचा पक्षप्रवेशावर पवार आज अंतिम निर्णय घेऊ शकले नाहीत. येत्या काही दिवसांत पक्षातील अन्य नेत्यांशी चर्चा करून खडसेंच्या पदाबाबत चर्चा होईल.

त्यानंतरच त्यांच्या  पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरवला जाईल अशी माहितीही पुढे आली आहे. आजच्या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER