या सात नेत्यांमुळे लागली महाविकास आघाडीला साडेसाती

Mahavikas Aghadi

एका बाजूला धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप झाले तर दुसरीकडे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या जावयाला अटक झाली. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मोठे नेते चौकशीच्या भोवऱ्यात सापडलेत. अनेक बड्या नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्यात. पैकी सात असे नेते आहेत, ज्यांची चाललेली चौकशी महाविकास आघाडीसाठी साडेसाती ठरू शकते.

अजित पवार
उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) चौकशी यंत्रणेच्या निशाण्यावर आहेत. सत्तेत आल्यानंतर मे २०२० मध्ये ईडीनं अजित पवारांची आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करायला सुरुवात केली होती. राज्यातल्या भ्रष्टाचारविरोधी विभागानं अजित पवारांना या प्रकरणात निर्दोष ठरवलेलं असलं तरी केंद्राची चौकशी यंत्रणा ‘ईडी’ मात्र अजितदादांच्या मागं आहे.

धनंजय मुंडे
राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी असणाऱ्या धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. धनंजय मुंडेंनी फेसबूक पोस्ट लिहीत आरोप फेटाळून लावले असले तरी त्या महिलेच्या बहिणीशी संमतीने संबंध बनवल्याचे धनंजय मुंडेंनी कबूल केले.

बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी लग्न केले  असून तिच्यापासून दोन मुलं आहेत. त्यांना स्वतःचं नाव दिल्याचंही धनंजय मुंडे सांगतात. यात भाजपने दोन्ही आघाड्यांवर धनंजय मुंडेंना कोंडीत पकडत  मुंडेंकडून राजीनामा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.

नवाब मलिक
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाला नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने अटक केली. ड्रग्स तस्करीसाठी त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ड्रग्ज प्रकरणात आरोपी असणाऱ्या व्यक्तींसोबत मलिक यांचे जावई समीर खान संपर्कात असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आदित्य ठाकरे
सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर भाजप नेते नारायण राणेंनी मोठा आरोप केला होता. या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांचे चिरंजीव, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची चौकशी झाल्यास ते अडचणीत सापडतील, असे विधान केले होते. हे आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावले होते.

संजय राऊत
दैनिक सामनाचे संपादक, राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची इडीने चौकशी केली. काही दिवसांपूर्वीही चौकशी झाली. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी ही चौकशी झाली. मैत्रिणीकडून घेतलेल्या ५० लाखांच्या कर्जप्रकरणी ईडीनं वर्षा राऊतांना समन्स बजावला होता. या प्रकरणात ईडीने सविस्तर चौकशी करत जबाब नोंदवून घेतलाय.

एकनाथ खडसे
भाजपशी घटस्फोट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना, “तुम्ही माझ्यामागं ईडी लावली तर मी सीडी लावीन.” असं विधान केलं होतं. यावरून त्यांना ईडीची धास्ती असल्याचा अंदाज लावता येतो. यानंतर पुण्यातल्या भोसरीमधील जमीन व्यवहारप्रकरणी चौकशीचे आदेश ईडीने दिलेत.

प्रताप सरनाईक
मराठीच्या मुद्द्यावर रान उठवत स्थापना झालेल्या शिवसेनेच्या आमदारानं गुजरात भवन उभारलं. त्यांच्या नावाची भरपूर चर्चाही झाली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) ईडीच्या रडावर आहेत.

टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात त्यांचं नाव समोर येतंय. या घोटाळाप्रकरणी ईडीने सरनाईकांसमवेत त्यांच्या मुलाचीही चौकशी केली.

ईडीची पीडा मागे लागलेल्या महाविकास आघाडीच्या या नेत्यांबरोबरच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागानं नोटीस बजावली होती. या नोटिसीतून गेल्या १० वर्षांतील संपत्तीची माहिती आयकर विभागाने पृथ्वीराज चव्हाणांकडून मागवली.

ईडीची शोध मोहीम सुरू असली तरी याआधीही ईडीने अनेकांची चौकशी केली. राज्यातील बडे नेतेही ईडीच्या रडावर होते.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER