आमदाराच्या राजीनाम्यामुळे या केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसचे सरकार आले अल्पमतात

Deshmukh

पुदुच्चेरी : पुदुच्चेरी विधानसभेची निवडणूक (Puducherry Assembly Election) मे २०२१ मध्ये होणार आहे. प्रचाराच्या संदर्भात काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) उद्या (बुधवारी) पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी काँग्रेसच्या एका आमदाराने राजीनामा दिला असून यामुळे या केंद्रशासित प्रदेशातील काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार अल्पमतात आले आहे.

सध्या देशात ५ राज्यांमध्ये आणि पुदुच्चेरी या एका केंद्रशासित प्रदेशात काँग्रेस सत्तेवर आहे. काँग्रेसच्या आमदाराच्या राजीनाम्यामुळे पुदुच्चेरीमधील काँग्रेसचे सरकार पडण्याच्या बेतात आहे. विरोधीपक्ष भाजपाने विधानसभेत बहुमत चाचणीची मागणी केली आहे.

आत्तापर्यंत ४ आमदारांचे राजीनामे

पुदुच्चेरीमध्ये काँग्रेस आणि द्रमुक आघाडीचे सरकार आहे. आत्तापर्यंत सत्ताधारी पक्षाच्या ३ आमदारांनी राजीनामे दिले असून आता ए. जॉन कुमार यांनी विधानसभा अध्यक्ष व्ही. पी. सिवकोलुंथू यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. याआधी ए. नामासिवायम आणि मल्लाडी कृष्ण राव हे दोन मंत्री आणि ई. थीप्पैथन या आमदाराने राजीनामा दिला आहे. शिवाय, एन. धनवेलू यांना पक्षविरोधी कारवायांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे ३३ आमदारांच्या पुदुच्चेरी विधानसभेमध्ये आता काँग्रेस-द्रमुक आघाडीचे १४, भाजप-अद्रमुक आघाडीचे देखील १४ आमदार राहिले आहेत. सत्ताधारी आघाडीच्या १४ आमदारांमध्ये १० काँग्रेस, ३ द्रमुक आणि १ अपक्ष आहे तर भाजपा-अद्रमुक आघाडीमध्ये ३ भाजपा, ७ एनआर काँग्रेस आणि ४ अद्रमुकचे आमदार आहेत.

जॉन कुमार भाजपामध्ये जाण्याची शक्यता

पुदुच्चेरीचे आरोग्यमंत्री मल्लाडी कृष्णा राव यांनी नुकताच राजीनामा दिला होता. त्यानंतर २४ तासात कुमार यांनी देखील राजीनामा दिला आहे. कुमार हे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्या जवळचे मानले जातात. २०१६ मध्ये त्यांनी जिंकलेली जागा, त्यांनी नारायणसामी यांच्यासाठी सोडली होती.

मात्र, नुकत्याच त्यांच्या दिल्लीमध्ये भाजपाच्या काही नेत्यांसोबत झालेल्या बैठकांनंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. आज त्यांनी राजीनामा दिला. याआधी ए. नामासिवायम आणि ई थीप्पैथन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER