काँग्रेसच्या अन्यायामुळे पवारांना पंतप्रधानपदाला मुकावे लागले – रामदास आठवले

Ramdas Athawale

मुंबई :  शरद पवार हे देशातील जाणते नेते आहेत. देशभरात त्यांची शेतकरी नेते म्हणून ओळख आहे. एकेकाळी काँग्रेसमध्ये असताना त्यांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी चालून आली होती. मात्र काँग्रेसने गांधी घराण्याचा विचार करून एका जाणत्या नेत्यावर अन्याय केला. काँग्रेसमुळे शरद पवारांना (Sharad Pawar) पंतप्रधानपदापासून मुकावे लागले, अशी उद्विग्न प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आज नागपुरात विदर्भातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आले असता ते बोलत होते. यावेळी रामदास आठवले म्हणाले की, १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ६८ खासदार निवडून आले होते. त्यावेळी शरद पवार हे विरोधी पक्षनेत्याचे प्रबळ दावेदार होते. मात्र काँग्रेसने गांधी घराण्यासाठी पक्षाचे निकष बदलले. आणि शरद पवारांना बाजूला सारून काँग्रेसच्या वर्तमान प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. त्यामुळे शरद पवार पुढच्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे दावेदार राहू शकले नाहीत. हा त्यांच्यावरचा सर्वांत  मोठा अन्याय झाला असल्याचे आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही भाष्य केले. ते म्हणाले की, केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही. मोदी सरकार आंदोलन संपुष्टात यावे यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र याबरोबर शेतकऱ्यांनीही एक पाऊल मागे घेण्याची गरज आहे.

कायद्यात एपीएमसी बंद करण्याचे कुठलेही प्रावधान नाही. आपला माल विकण्यासाठी शेतकरी स्वतंत्र असणार आहे. एएसपी कायम असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केंद्रासोबत चर्चा करून तोडगा काढावा. मात्र काही राजकीय पक्ष आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांना जे कायद्यात नको आहे ते त्यांनी सांगावं, त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली जात असल्याचंही आठवले म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार पुढील पाच  वर्षे नाही तर २५ वर्षे चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणतात २५ वर्षे आम्ही सत्तेत राहू, मग आम्ही काय करू?

असा मिस्कील  सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढील विधानसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढले तर आमचा मार्ग साफ आहे, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिका निवडणूकही आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केलाय. भाजप आणि आम्ही एकत्रच राहू. मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढेल. पण काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता आठवलेंनी व्यक्त केलीय. तसंच आम्ही जिंकलो तर महापौर भाजपचा आणि उपमहापौर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरावर असल्याची टीकाही त्यांनी केलीय.यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना एनडीएत सहभागी होण्याची ऑफर दिली. वेगळं लढून मतं खाण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएसोबत यायला हवं. त्यावर त्यांनी विचार करावा. जर आम्ही दोघे आलो तर सत्तेत मोठा वाटा मिळेल. त्याचा फायदा समाजाला होईल. एकमेकांना पाडण्यापेक्षा समाजासाठी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले. आता राज्यात पक्ष विस्ताराचं काम सुरू  आहे. जिथे शक्य असेल तिथे आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपसोबत युती करणार आहोत. भाजपने आम्हाला सन्मानजनक जागा द्याव्यात. जर जागावाटपात समाधान झाले नाही तर, आम्ही स्वतंत्र लढू, अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER