ऊसाला लागलेली आग विझवताना शेतक-याचा जळून मृत्यू

sugar cane in fire

कोल्हापूर- ऊस तुटून गेल्यानंतर फडातील शिल्लक पालापाचोळा पेटवत असताना शेजारच्या उभ्या ऊसाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्नात हातकणंगले तालुक्यातील लाटवडेचे शेतकरी शिवाजी कोळी (४५) यांचा जळून मृत्यू झाला. ही घटना दुपारी १२च्या सुमारास घडली.

कोळी हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांचा ऊस नुकताच तुटून गेला होता. राहिलेला पालापाचोळा पेटवून नव्या पिकाची तयारी करण्यासाठी कोळी आज १२:00 च्या सुमारास शेतात गेले होते. उनाच्या कडाक्यात त्यांनी पाल्याला लावलेली आग भडकली आणि शेजारी असलेल्या ऊभ्या ऊसाला लागली. शेजा-याचे नुकसान होऊ नये म्हणून कोळी आग विझवण्यासाठी ऊसात शिरले. तणामध्ये पाय अडकून खाली पडल्यानंतर आगीच्या झळांमध्ये त्यांना उठताच आले नाही. आणि या आगीत त्यांचा जळून मृत्यू झाला.

कोळी हे अल्पभूधारक शेतकरी असून शेती आणि मजूरी करून ते आपल्या पत्नी आणि दोन मुलं अशा कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.