नाणार प्रकल्पाचे समर्थन केल्याने शिवसेना पदाधिका-याची उचलबांगडी

सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून हा विरोध कायम राहणार आहे. मात्र लगेचच काही शिवसैनिका या प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. यामुळे सागवे येथील शिवसेना विभागप्रमुख राजा काजवे यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्यासोबतच्या पदाधिका-यांचीसुद्धा हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

तीन गावठी रिवॉल्व्हर बाळगणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

या प्रकरणी विभागप्रमुख राजा काजवे यांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी कमलाकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काजवे यांच्यासह शिवसेनेचे इतरही पदाधिकारी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबद्दलचा अहवाल पक्षाकडून मागवण्यात आला आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे

नाणार प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (१७ फेब्रुवारी) शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले. नाणार रिफायनरीबाबत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये जाहिरात आली होती. पण जाहिरातदार शिवसेनेचं धोरण ठरवत नाहीत. शिवसेनेचे धोरण आणि भूमिका मी ठरवत असतो, असे ठाकरे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना म्हणाले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाणारबाबतची भूमिका स्पष्ट केली.

एका बाजूला उद्धव ठाकरे नाणारला विरोध असल्याचे निक्षून सांगत असताना दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्गातले शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. नाणार प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचा असल्याचं म्हणत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. प्रकल्प पूर्ण करण्याची हीच ती वेळ असे फलकदेखील शिवसैनिकांच्या हातात होते.