राज ठाकरेंच्या सभेवर पावसाचे सावट: सभा रद्द झाल्याने श्रोत्यांचा हिरमोड

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बुधवारी (9 ऑक्टोंबर) पुण्यात होणा-या सभेत पक्षाच्या प्रचाराचा नारळ फुटणार होता. त्यामुळे ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने राज ठाकरेंची पहिलीच प्रचारसभा होण्याआधीच रद्द करावी लागली. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि आकाशातून कोसळणाऱ्या जलधारांमुळे मैदानात सर्वत्र चिखल झाला होता. जे कार्यकर्ते जमले होते त्यांनी मैदानातल्या खुर्च्या डोक्यावर घेऊन बचाव करावा लागला त्यामुळे सभा घेणे शक्य नसल्याने अखेर वेळेवर सभा रद्द करावी लागली.

मोठ्या प्रयत्नानंतर त्यांना सरस्वती मंदिर शाळेचे मैदान मिळाले. या सभेवर परतीच्या पावसाचे सावट होते. सभा होणार की याची भीती होती अखेर ती भितीच खरी ठरल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. मनसेचे एकमेव स्टार प्रचारक मुलुख मैदानी तोफ असलेल्या राज ठाकरेंच्या सभेची सगळ्यांनाच उत्सुकता होती. कसबा गणपतीचे दर्शन घेऊन राज ठाकरे भाषण करणार होते.

मनसेचे अजय शिंदे यांच्यासाठी पुण्यातील कसब्यात ही सभा होणार होती. भाजपच्या मुक्ता टिळक यांना त्यांनी आव्हान दिले होते. या मतदारसंघात शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली तर काँग्रेसचे अरविंद शिंदे ही मैदानात आहेत. गिरीश बापट खासदार होऊन दिल्लीत गेल्याने भाजपने महापौर मुक्ता टिळक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पुण्यात मनसेचा जनाधार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी राज यांच्या या सभेकची कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहात होते. मात्र त्यांचा हिरमोड झाला.