मोदी-शहा जोडीचा प्रयोग फसल्यामुळेच 5 वर्षानंतर पत्रपरिषद : अशोक चव्हाण

सोलापूर:  देशात मोदी-शहा जोडीचा प्रयोग फसल्यामुळेच 5 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुक निकालाच्या तोंडावर पत्रकार परिषद घ्यावी लागल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. पाच वर्षानंतर पंतप्रधान मोदींना पत्रपरिषद घ्यावी वाटली, हा बदल का झाला, कारण लोकांची नाराजी त्यांना समजली, असेही चव्हाण म्हणाले. सोलापुरात ते बोलत होते.

चव्हाण म्हणाले, राज्यातील दुष्काळ काँग्रेस उपसमिती अहवाल प्राप्त झाला असून त्यात राज्यातील दुष्काळ भयानक परिस्थिती समोर आली आहे. दुष्काळाबाबत सरकारने आश्वासन दिले. मात्र, अंमलबजावणी केल्याचे दिसत नाही. सरकार केवळ शब्दखेळ करत आहेत. सध्या त्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्स खेळ सुरु असल्याचे सांगून ते म्हणाले, दुष्काळग्रस्तांची मते घेतली, पण समस्या काय? याकडे पाहिले नाही, उपेक्षा केल्या. सरकारला जाग आलेली नाही.

केंद्र सरकारने 4 हजार 300 कोटी रूपयांची जिल्हानिहाय मदत काय केली, याचा हिशेब आधी सरकारने द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. विरोधी पक्ष नेते आणि गट नेते पदाचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा स्विकारल्याचे सांगताना चव्हाण म्हणाले, विरोधी पक्ष नेतेपदी परिवर्तन होईल. विधीमंडळ काँग्रेस नेत्यांची बैठक होणार असल्याचे ते म्हणाले.