मदतीला विलंब झाल्यामुळेच विदर्भातील शेती अन् घरांचे मोठे नुकसान – फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई : विदर्भातील पूरस्थिती हाताळण्याबाबत मदतकार्य उशिरा सुरू झाल्यामुळे विदर्भात घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोथे नुकसान झाले आहे.

भंडारा जिल्ह्यातील 58 गावातील सुमारे 2646 कुटुंबाना पुराचा फटका बसला. मदत व बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिवसभर पूरग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी स्थितीची पाहणी केली.

पुराचे पाणी शहरात शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. फडणवीस म्हणाले की, 36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते. मदतीला विलंब लागल्याने घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

मध्य प्रदेश सरकारसोबत राज्य शासनाने योग्य समन्वय साधला नाही. राजीव सागर धरणातून पाणी सोडल्यानंतर ते पाणी 36 तासात पूर्व विदर्भात पोहोचते. हे 36 तास हाती असतानाही सरकारने कारवाईला विलंब केल्याने पाणी गावात शिरले. वेळीच अलर्ट दिला असता, तर हे संकट टाळता आले असते, असे फडणवीस यांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्यात या पूरस्थितीचा मोठा फटका बसला आहे. सुमारे 5 हजार कुटुंब बाधित झाले आहेत. नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातही अशीच परिस्थितील आहे. कर्नाटकमधील अलमट्टीप्रश्नी आता महाराष्ट्राने खंबीर भूमिका घ्यावी. आम्ही त्यांच्यासमवेत आहोत; कारण धरणाची उंची वाढवल्यामुळे काय परिणाम होतील हे आपल्याला गेल्यावर्षीच कळून चुकले आहे, असे फडणवीस म्हणाले.

भंडारा जिल्ह्यात स्थिती गंभीर

भंडारा तालुक्यातील 23 गावातील 1790 कुटुंब, पवनी तालुक्यातील 22 गावातील 505, तुमसर तालुक्यातील 5 गावातील 127, मोहाडी तालुक्यातील 6 गावातील 167 व लाखांदूर तालुक्यातील 2 गावातील 57 कुटुंब अशा एकूण 58 गावातील 2646 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर मदत व बचाव कार्य करीत आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER