वातावरणातील बदलामुळे हापूस आंब्याचे आगमन लांबवर

Hapus Mango

रत्नागिरी : लांबलेला पावसाळा, थंडीचा अभाव, ढगाळ वातावरण व आताच पडलेला अवकाळी पाऊस याचा विपरीत परिणाम आंबा व काजू उत्पादनावर होण्याची भीती आहे. आंबा कलमांना मोहोर येण्याची प्रक्रियाच लांबल्याने हापूसचे आगमन किमान दीड ते दोन महिने उशिराने होण्याची शक्यता आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत. शिवाय प्रतिकूल परिस्थिती पाहता आंबा व काजूचे उत्पादन यावर्षीही पूर्ण क्षमतेने येण्याची शक्यता नाही. हापूस बाजारपेठेत उशिरा दाखल होणार असल्याने त्याला योग्य दरही मिळणार नाही. गतवर्षाप्रमाणेच यावर्षीही आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

आंबा व काजू ही पिके सिंधुदुर्ग (Sindhudurg) व रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील ‘कॅश क्रॉप’ म्हणून ओळखली जातात. या दोन्ही फळ उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी असल्याने देशाला परकीय चलनही मिळते. मात्र गेल्या दहा वर्षांपासून आंबा व काजू उत्पादनाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसत आहे. सर्वसाधारणपणे कोकणात ऑक्टोबर महिन्यापासून थंडी जाणवायला सुरूवात होते. या थंडीमुळे आंबा, काजूला मोहोर फूटू लागतो. या पहिल्या टप्प्यातील मोहोराचा आंबा सर्वसाधारणपणे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये बाजारात येतो. मात्र यावर्षी पावसाळाच नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने आंबा, काजू उत्पादनाचे वेळापत्रकच बिघडले. नोव्हेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात काहीशी थंडी जाणवल्याने आंबा, काजू कलमांवर मोहोर दिसू लागला, मात्र डिसेंबर सुरू होताच थंडी अचानक गायब झाली. ढगाळ वातावरण तयार झाले. सरासरी तापमानही वाढले व त्यात कहर म्हणजे गेल्या चार दिवसात जिल्हाभरात अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे आंबा, काजू उत्पादनाचे वेळापत्रक व अर्थकारण पुरते कोलमडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER