बोगस बियाण्यांमुळे राज्यातील शेतकरी हवालदील

नाशिक : सरकारी प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत राज्यात सहा वर्षांत तब्बल २३ हजार ६६८ बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळून आले असून राज्यातील शेतकरी बोगस बियाण्यांच्या संकटाने पुरता हवालदील झाला आहे. गंभीर बाब म्हणजे अशा प्रकारे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत कृषी विभागाला मर्यादा आहेत.

अजित पवार म्हणाले….तर बायको मला हाकलून देईल

३ ऑक्टोबर २०१९ ला माधुरी कंपनीचे फ्लॉवरचे बियाणं नाशिकच्या पळसे गावातील भाजीपाला उत्पादक शेतकरी रुंजा गायधनी यांनी घेतले होते. मात्र अर्धा एकरवरच्या फ्लॉवरला तीन महिन्यांनंतर कंद न आल्याने फसवणूक झाल्याचे, गायधनी यांच्या लक्षात आले. या प्रकरणी न्यायाबाबत सरकारी यंत्रणेकडून त्यांची निराशा झाली. उलट देणेकऱ्यांचा तगादा सुरु झाला. त्यामुळे भरपाई मिळावी आणि संबंधित कंपनीवर कारवाई करावी, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया गायधनींनी दिली आहे.

राज्यात २०१२ पासून २३ हजार ६६८ अप्रमाणित नमुने आढळून आल्याचे उघड झाले आहे. गायधनी यांच्याप्रमाणेच राज्यातल्या असंख्य शेतकऱ्यांचीही अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे. त्याचा अहवाल कृषी खात्याच्या गुणवत्ता विभागाने सरकारला सादर केला आहे. मात्र बोगस बियाणे आणि औषधांबाबत कारवाईचे अधिकार नसल्याने, राज्यातल्या कृषी विभागाचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे असे कुठे घडत असेल तर त्यांची चौकशी करून कारवाई करू इतकेच आश्वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावर दिल आहे.