भाजप आणि शिवसेनेच्या मनोमिलनाने कोकणात राणेंना धक्का

Narayan Rane

रत्नागिरी: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपचे अखेर मनोमिलन झाल्यामुळे भाजपचा विरोध असलेल्या विनायक राऊत यांच्यासाठी भाजपने पहिल्यांदा स्वतंत्र मेळावा घेऊन राऊतांच्या प्रचारात सहभागी होण्याचे ठरविल्यामुळे राऊतांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष आता एनडीएत नसल्याचे भाजपचे नेते म्हणत असल्यामुळे अखेरच्या टप्प्यात घडवण्यात आलेले हे मनोमिलन मतांमध्ये कितपत परिर्वर्तीत होईल याबाबत कार्यकर्त्यांत संभ्रम असल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच झालेल्या भाजपाच्या या समर्थन मेळाव्यात हजेरी लावणाऱ्या विनायक राऊतांनीही चार वर्षात झालेल्या आपल्या चुका पदरात घ्या असे भावनिक आवाहन भाजपाच्या कार्यकर्त्याना केले आहे. विनायक राउतांना होणाऱ्या विरोधाचे रणशिंग फुंकणाऱ्या सिंधुदुर्ग भाजपालाच अखेर वरीष्ठ नेत्यांच्या दबावामुळे मतभेद बाजूला ठेवून राऊतांच्या प्रचारासाठी मेळावा घ्यावा लागणार आहे.

दुर्दैवाने मागच्या चार साडेचार वर्षात जे राजकीय वातावरण होते त्यामुळे ते कदाचित होऊ शकले नाही. पण यापुढे अशा चुका होणार नाहीत, असे राऊत म्हणाले. दुसरीकडे नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षानेही या आधीच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनाच आपला पाठिंबा जाहिर केला. भाजप नेते विनायक राऊतांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत असे कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे. राणेंचा पक्ष एनडीएत नसल्याचे भाजप नेते सांगत आहेत. हाच धागा पकडून राणेंचे कट्टर विरोधक दीपक केसरकरनीही भाजपच्या सुरात सूर मिसळवला आहे.