यासाठी चांगलं काम करून देखील माझी नियुक्ती रद्द केली – नरेंद्र पाटील

Ashok Chavan-Narendra

मुंबई : मराठा समाजावरील असलेले आरक्षण स्थगित केल्यानंतर त्यापदावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम मराठा आरक्षण  (Maratha Reservation)उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना तत्काळ हटवा आणि त्याजागी शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना अध्यक्ष करा, ही मागणी मी सातत्याने समाजमाध्यमातून लावून धरल्यामुळेच माझी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महमंडळावरील नियुक्ती रद्द करण्यात आली आहे, असा आरोप माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केला आहे. नरेंद्र पाटील यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली आगामी भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर हा आरोप केला.

याबाबत बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, माझी २०१८ साली अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. माझ्या नियुक्ती नंतर मी महामंडळाची मोठ्या प्रमाणात कामे देखील केली. परंतु ९ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती बसली आणि त्यानंतर मात्र मी माझी भूमिका बदलत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर सातत्याने टीका करण्यास सुरुवात केली कदाचित हीच बाब त्यांना आवडली नसावी. आणि त्यामुळेच अचानक महामंडळातील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान यावेळी पत्रकारांनी तुम्ही अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्र पाटील म्हणाले की, सध्या अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यांच्यामुळे समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे त्यामुळे आमची मागणी आम्ही कायम ठेवणार आहोत. आता आम्ही अशोक चव्हाण हटाव एकनाथ शिंदे लावो ही भूमिका लावून धरणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्याठिकाणी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी म्हणजे समाजाचं अजून नुकसान होणार नाही.

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दबावात काम करतायत असं वाटतं का? या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, मी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी चांगलं काम करून देखील माझी नियुक्ती रद्द केली. सरकारवर अशोक चव्हाण यांना हटवा यासाठी मराठा समाजाचा दबाव असून देखील मुख्यमंत्री त्यांना हटवत नाहीत. त्यामुळे नक्कीच ते दबावाखाली काम करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचा देखील दबाव असू शकतो कारण मी राष्ट्रवादीचा आमदार असताना सरकार विरोधातच मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. शिवाय राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर मी निवडणूक देखील लढलो आहे.

सध्या कौशल्य विकास खातं राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे त्यांनी देखील दबाव टाकला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अचानक नियुक्ती रद्द झाली आहे या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, हा निर्णय अपेक्षित जरी असला तरी कुठंतरी अपमानास्पद वागणूक दिल्याची भावना देखील आहे. मुख्यमंत्री यांनी बोलावून सांगितलं असतं तर मी स्वतःच राजीनामा दिला असता. हे करण्यापूर्वी चर्चा तरी करायला हवी होती. तुम्ही स्वगृही परतणार आहात का? या प्रशाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, मी याबाबत आद्यप काहीच निर्णय घेतला नाही. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेईल त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटेल आणि त्यानंतर पुढील भुमिका जाहीर करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER