पुण्यात ड्रग्ज : सावध ऐका पुढल्या हाका…

Pune City & Drugs

Shailendra Paranjapeपुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर तीन महिन्यांत कायदा सुव्यवस्था यामध्ये बदल झालेला दिसेल, असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच लागोपाठ दिवसाढवळ्या खुनांचे प्रकार, खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाला धमकी आणि खून, असे प्रकार घडले होते. त्यामुळे पुणं हे गुन्हेगारीचं शहर कसं होऊ लागलंय, हे आम्ही ८ ऑक्टोबरला याच लेखमालेत मांडलं होतं.

या गोष्टीला पंधरवडा लोटत नाही तोवर पुण्यातून धक्कादायक गुन्हेगारी बातमी आलीय. ती म्हणजे रांजणगावमध्ये झालेली मेफेड्रॉन या ड्रग्जची निर्मिती आणि त्याचे कनेक्शन थेट छोटा राजनपर्यंत असल्याचं वृत्त प्रसारित झालंय. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी १४ जणांना अटक केली असून २० कोटी रुपयांची ड्रग्ज जप्त केलीत. एकूण ड्रग्जनिर्मिती १३० कोटी रुपयांहूनही अधिक किमतीची केली गेलीय.

आजवर पेन्शनरांचं पुणं, विद्येचं माहेरघर पुणं, ऑटोमोबाईलचं शहर, चांगली हवा आणि पाणी याबरोबर महिलांना अगदी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक ठिकाणी फिरता येणारं शहर, आयटीचं शहर आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचं मार्गदर्शन घेण्याचं शहरही पुणंच, असा लौकिक होता; पण आता पुण्याची मुंबई होऊ लागलीय, पुणं महानगर होत चाललंय आणि छोट्या हवेशीर, टुमदार शहराचं रूपांतर महानगरात होताना आपसूक होणारे तोटेही पुण्याला जाणवू लागलेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अकार्यक्षम असल्यानं किंवा ठेवली गेल्यानं पुण्यात दुचाकी गाड्यांची संख्या देशामध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागात कोणत्याही वेळी वाहनाने जायचे तर अंगावर काटा येईल, असे वाहतूक खोळंबे वा ट्रॅफिक जॅम अनुभवाला येतात. सध्या तुळशीबाग, मंडई परिसरात संध्याकाळी जायचे तर अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत मुंगीच्या पावलानं चालावं लागतं, तशी अवस्था आहे. दुकानदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि दिवाळीपर्यंत ही गर्दी अशीच सुरू राहील, असा अंदाज आहे. कोरोनामुळे नोकऱ्या जाणे, हाताला काम नसणे, पगार कापले जाणे, उद्योगधंद्यांमध्ये निराशेचे वातावरण असणे या सर्व गोष्टींमुळे शहरात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

त्यातच रांजणगावमध्ये ड्रग्जनिर्मिती केली गेल्याचं प्रकरण पुढे आलंय. १४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आलीय. अमलीपदार्थ तयार करून ते बाहेर पाढवण्याचं रॅकेट उघडकीस आलं असून ही ड्रग्ज पालघरमध्येही पाठवली गेल्याचं बातम्यांमध्ये नमूद करण्यात आलंय. हा सारा प्रकार पुण्याच्या प्रतिमेला तडा देणाराच आहे. अपघात, जमिनींचे भाव वाढल्याने वाढलेली गुन्हेगारी, त्यात विविध टोळ्यांचा सहभाग हे सारं पुण्यानं गेल्या दोन दशकांमध्ये अनुभवलं आहे. मुळशी भागात जागांचे वाढलेले भाव आणि दरमहा पडणारा एक तरी खून, या साऱ्या बाबींवर ‘मुळशी पॅटर्न’ नावाचा सिनेमा पुण्याच्या प्रवीण तरडेनं लोकांपुढे आणला.

बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी फोन येणं, अपहरण, खून, जागेच्या वादातून खून, राजकीय वैमनस्यातून खून, दरोडे हे सारं पुण्यात यापूर्वी झालंय. पण ड्रग्जनिर्मिती आणि ती रांजणगावमध्ये ही चितेंची बाब आहे. रांजणगाव किंवा दौंडच्या केमिकल झोनमध्ये पैसे गुंतवून ड्रग्ज वा अमलीपदार्थांची निर्मिती केली गेली तर येणाऱ्या पिढ्या बरबाद करण्याचं काम पुण्यातून केलं जातंय, असा भविष्यातला इतिहास निर्माण होऊ शकतो. त्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.

सर्वच नागरिकांनी आपल्या आजूबाजूला काय चाललंय, याचं भान ठेवायला हवं. दोन-अडीच दशकांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ ही मोहीम सुरू केली होती. तशीच मोहीम औद्योगिक क्षेत्रातही, ‘आपला शेजारी नक्की काय करी’ ही मोहीम राबवायला हवी. नाही तर छोट्या छोट्या औद्योगिक प्लॉट्समध्ये भविष्यातले पिढ्या नासवणारे ड्रग्जरूपी बॉम्ब तयार होतील. याविरुद्ध जबर धसका घेतला जाईल, अशाच कारवाईची गरज आहे. नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER