अमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम

Ujjwal Nikam

जळगाव : सृष्टीतील काही कलाकारांच्या मोबाईलमधील ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’वरून अमली पदार्थ वापर / व्यापार संदर्भात काही नावे उघड झाली आहेत. मात्र, फक्त व्हॉट्सअ‌ॅप चॅट हा त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसा पुरावा होऊ शकत नाही, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी आणखी सखोल तपास करावा लागणार आहे, असे ते म्हणालेत.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाकडून तपास सुरू आहे. या तपासात रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये मिळालेल्या माहितीवरून बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहे. यामध्ये रकुलप्रीत सिंग, फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा, अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा समावेश आहे.

याबाबत उज्ज्वल निकम म्हणाले की, या प्रकरणात अभिनेता किंवा अभिनेत्रींचे मोबाईलवरील व्हॉट्सअ‌ॅप चॅट सक्षम पुरावा ठरणार नाही. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सखोल तपास करावा लागणार आहे. संबंधित अभिनेते किंवा अभिनेत्री या कुणाकडून ड्रग्ज घेत होत्या, याच्या मुळापर्यंत जावे लागणार आहे.

एनसीबीच्या रडारवर ५० सेलिब्रिटीज

एनसीबीने रिया चक्रवर्ती, ड्रग पेडलर्ससह इतर लोकांना अटक केली आहे. अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या (NCB) रडारवर ५० पेक्षा जास्त सेलिब्रिटी आहेत, अशी माहिती आहे. यामध्ये काही बड्या निर्मात्यांसोबत दिग्दर्शकांचाही समावेश आहे. अमली पदार्थाबाबत तपास करीत असलेल्या एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोनसह श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि अन्य जणांचा चौकशीसाठी समन्स पाठविला आहे. एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की दीपिकाला शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे. तपासात DNSK असे सांकेतिक नाव आली आहेत. एनसीबी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. D म्हणजे बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि K म्हणजे तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश. दीपिकाचे करिश्मासोबत ड्रग्जसंबंधी चॅट सापडले आहेत. त्यामुळे करिश्मा आणि दीपिका दोघींचीही चौकशी होणार आहे. २५ सप्टेंबरला दीपिकाची चौकशी होणार आहे.

ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानचेही नाव आले आहे. सारा एका हाय प्रोफाइल ड्रग पेडलरच्या संपर्कात होती. एनसीबी त्याचा शोध घेत आहे. सुशांतने सारासह केदारनाथ फिल्ममध्ये काम केले होते.

रियाने चौकशीत सांगितले की, केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूर्वीही तो ड्रग्ज घेत होता, मात्र त्यानंतर त्याला ड्रग्जचे व्यसन लागले होते. एनसीबीने सारालाही चौकशीसाठी बोलावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER