एक थेंब अश्रुसाठी….

एक थेंब अश्रुसाठी....

आले दिग्दर्शकाच्या मना तेथे कोणाचे चालेना… सिनेमा असो किंवा मालिका ,त्यातला सीन परफेक्ट होण्यासाठी कलाकारांना खूपच मेहनत घ्यावी लागत असते. दिग्दर्शकाच्या मनातला सीन प्रत्यक्षात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कलाकारांना देखील अनेकदा रिटेक घ्यावे लागतात. अशा वेळेला कलाकारांच्या अभिनयाचा कस देखील लागत असतो. असाच अनुभव आला आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा नायक जयदीप शिर्केची भूमिका करणाऱ्या मंदार जाधव (Mandar Jadhav) याला. पाणावलेल्या डोळ्यातून गालावर टपकन पडणारा एक अश्रू दिग्दर्शकाला कॅमेराबद्ध करायचा होता आणि यासाठी मंदार जाधवला खूप सारे रीटेक करावे लागले. अर्थात यामध्ये त्याच्या अभिनयाचा दोष नव्हता पण बरोबर त्या पाणावलेल्या डोळ्यातून तो थेंब गालावर पडणं आणि तो कॅमेऱ्याध्ये क्लिक होणं यासाठी सगळा प्रपंच मांडला होता. पण ज्या क्षणी तो एक थेंब अश्रू (Tears)टपकला त्याक्षणी मंदार दिलखुलासपणे हसला. हा सगळा किस्सा त्याने त्याच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत जयदीप शिर्के पाटील ही भूमिका मंदार जाधव साकारत आहे, तर गौरीच्या भूमिकेत गिरिजा प्रभू पाहायला मिळत आहे. सध्या या दोघांच्या लग्नानंतरचे काही इमोशनल सीन कथेमध्ये आले आहेत आणि ते प्रेक्षकांना खूपच आवडत आहेत.

यातील एका खास सीनबद्दल मंदार सांगतो, मला सांगण्यात आलं होतं की हा सीन खूप महत्त्वाचा आहे. या सीनमध्ये तुला एकही संवाद बोलायचा नाही. फक्त रडायचे आहे. हे ऐकून सुरुवातीला मला खूप छान वाटलं पण जेव्हा खरंच सीन करायला घेतला तेव्हा त्या एक थेंब अश्रुसाठी मला काय काय करावे लागले याचा विचार करून आता मला हसू येतंय. पण प्रत्यक्षात सीन करत असताना मात्र खरंच माझ्या अभिनयाची कसोटी लागली होती. बेडवर झोपलेल्या गौरीकडे पाहत जयदीपचे डोळे पाणावतात आणि एका क्षणी एक अश्रू त्याच्या डोळ्यातून त्याच्या गालावर पडतो असं हे दृश्य होतं. मालिकेतील इमोशनल सीनसाठी नेहमीच कलाकारांना त्यांचे बेस्ट द्यावे लागते. असे भावूक क्षण प्रेक्षकांना खिळवून ठेवत असल्यामुळे हा सीन देखील वेगळ्या पद्धतीने चित्रित व्हावा असे या मालिकेच्या दिग्दर्शन टीमला वाटत होतं. त्यानुसार मंदारच्या डोळ्यावर कॅमेरा रोखला होता. सुरुवातीला ग्लिसरीन घालून त्याने डोळे रडवेले केले आणि त्यानंतर झोपलेल्या गौरीकडे पाहत त्याला डोळ्यातले अश्रू गालावर ओघळेपर्यंत चेहऱ्यावर इमोशनल भाव ठेवायचे होते. हा सीन शूट होत असताना केवळ मंदारच नव्हे तर सगळ्या सेटवरच्या टीमचे लक्ष मंदारच्या डोळ्यातून टपकन पडणाऱ्या अश्रूकडे लागून राहिले होते. जेव्हा तो अश्रू त्याच्या गालावर ओघळला त्यावेळी प्रत्येकाने टाळ्या वाजवून हा सीन यशस्वीरीत्या ओके झाल्याचा आनंद साजरा केला.

एखाद्या सीनमध्ये संवाद आहेत की नाही. मोठा ड्रामा आहे की नाही, यापेक्षा सुद्धा काहीही न बोलता तो सीन कशा पद्धतीने प्रभावी होऊ शकतो याचे उत्तम उदाहरणच मंदार आणि त्याच्या सगळ्या टीमने अनुभवलं. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या निमित्ताने मंदार सतत ऑफस्क्रीन धम्माल त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो.. मात्र यानिमित्ताने शेअर केलेली त्या एका अश्रची कथा त्याच्या चाहत्यांना देखील विलक्षण आवडून गेली. मंदार जाधव हा यापूर्वी श्री गुरुदेव दत्त या मालिकेमध्ये दत्त यांच्या भूमिकेत दिसला होता. आता तो लंडनहून परतलेल्या एका मराठी मुलाची भूमिका सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये करत आहे. मंदार सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेल्या अनेक कलाकारांपैकी एक आहे. या मालिकेमधील एखाद्या सीनच्या निमित्ताने घडणारा किस्सा त्याला सांगायला नेहमीच आवडतं. त्यामुळेच त्याच्या सोशल मीडिया पेजवर त्यांच्या चाहत्यांचे नेहमीच लक्ष लागून राहिलेले असते. मालिकेतील एका इमोशनलसीनसाठी भरल्या डोळ्यातून टपकणारा अश्रू देखील शूट करताना किती मेहनत घ्यावी लागते हे तर यानिमित्ताने मंदारला कळलेच पण दिग्दर्शकाच्या संकल्पनेनुसार काम करताना कशी मजा येते आणि त्यातून आपण कसे शिकत जातो हे देखील मंदारला कळालं असतं तर सांगतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER