
ठाणे : शहरातील वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच त्यांची वाढ झाली आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यासाठी आता महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली आहे. त्यानुसार 2018 मध्ये या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील 500 हेक्टरवरील वृक्षांची माहिती गोळा केली होती. त्यानंतर आता 2020 मध्ये देखील ड्रोनच्या माध्यमातून येथील पाहणी केली असता, लावण्यात आलेल्या वृक्षांमध्ये 25 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी 90 टक्के वृक्ष जगले असल्याचा दावाही वृक्ष प्राधिकरण विभागाने केला आहे.
ठाणे शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानंतर आता ठाणो महापालिकेच्या माध्यमातून आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील अनाधिकृत बांधकामांना आळा घालण्याबरोबर खाडीतील नष्ट होणाऱ्या कांदळवणावर नजर ठेवण्यासाठी शहरावर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवली जाणार आहे. हा प्रयोग देखील पालिकेच्या माध्यमातून सुरु झाला आहे. त्या आधीच वृक्ष प्राधिकरणाने हा प्रयत्न केला आहे. या विभागाच्या माध्यमातून 2018 मध्ये वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच वृक्षांची होणारी कत्तल रोखण्यासाठी शिवाय, त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमे:याची मदत घेण्यात आली होती.
त्यानंतर आता 2020 मध्ये जानेवारी महिन्यात या ड्रोन कॅमेऱ्याने 500 हेक्टरवरील वृक्षांवर एक आठवडा नजर ठेवली होती. त्यानुसार वृक्ष विभागाकडून लावण्यात आलेल्या 5 लाख वृक्षांपैकी 90 टक्के वृक्ष जगले असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच त्यांच्या वाढ ही 25 टक्यांपेक्षा जास्त झाल्याचे दिसून आले आहे. आता ही माहिती या विभागाच्या माध्यमातून महापालिकेच्या वेबसाईटवर देखील टाकण्यात येणार आहे.
आमच्या विभागाचा हा प्रयत्न आहे. दुसऱ्यादा नुकताच हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यामध्ये वृक्षांच्या वाढीमध्ये बदल झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय शहरावर किती ग्रीन कव्हर तयार होत आहे, याचीही माहिती यातून दिसत आहे.