कोल्हापूर : चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४५ प्रवाशांचा जीव वाचला

Kolhapur driver saved the lives of 45 passengers in accident

कोल्हापूर :कागल आगाराची एसटी (क्र. एम एच १४ बी टी – ३५७२) केवळ दैव बलवत्तर म्हणूनच घाटात कोसळता कोसळता वाचली. यामुळे बसमधील ४५ प्रवासी थोडक्यात बचावले. काल बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

कागल आगाराची बस कोल्हापूरहून तिलारी घाट मार्गाने पणजीला जात होती. यावेळी तिलारी घाटातील एका तीव्र उतारावरील वळणावर चालक एस. ए. चव्हाण यांचा बसच्या स्टेरिंगवरील ताबा सुटला. यामुळे बस वळणावरील दरीच्या दिशेने गेली. यावेळी दैव बलवत्तर म्हणून घाटातील संरक्षित कठड्याला आणि त्याच ठिकाणी असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात अडकून बस जागीच थांबली; अन्यथा खोल दरीत कोसळून मोठा अनर्थ घडला असता. या प्रकारानंतर बसमधील प्रवाशांनी घाबरून आरडाओरडा सुरू केला.

तीव्र उतार आणि त्याच ठिकाणी अवघड वळण असल्याने या ठिकाणाहून गाडी चालवताना चालकाला आव्हानच असते.

प्रवासीही या मार्गावरून जाताना जीव मुठीत धरूनच बसलेले असतात. चव्हाण या चालकाने प्रसंगावधान राखून मातीच्या ढिगाऱ्यावर बस चढवली, त्यामुळेच बसचा वेग कमी झाला आणि या दरम्यान वेग कमी झाल्याने बसवर ताबा मिळवून बस थांबवण्यात चालकाला यश मिळाले. यावेळी एका प्रवाशाने चालक चव्हाण हे आमचे देवदूत होते, अशी भावना व्यक्त केली.