मुंबईच्या धर्तीवर नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारावे -डॉ नितीन राऊत यांनी केली सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

Maharashtra Today

मुंबई :  नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या धर्तीवर नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक या प्रमाणे “ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र” उभारण्यात यावे अशी मागणी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दिव्यांग नागरिक आणि वरिष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहचून लस घेणे जिकिरीचे ठरते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांचे कोविड लसीकरण सुलभ होण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील पहिले ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ दादर येथील कोहिनूर पार्किंग लॉट मध्ये नुकतेच सुरू केले आहे. यामुळे ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांचे लसीकरण जलद गतीने होत आहे. या केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आपल्या वाहनात बसूनच लस घेता येते. या केंद्राला मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

नागपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक या प्रमाणे ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू केल्यास ज्येष्ठ आणि नागरिक दिव्यांग यांना लसीकरण केंद्रावर रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचेल आणि लसीकरण वेगाने होईल असे डॉ नितीन राऊत यांनी टोपे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button