ड्रीम्स मॉलच्या आगीची धग : सर्व मॉल, नर्सिंग होम, रुग्णालयांचे पुन्हा फायर ऑडिट! इतके रडारवर

Maharashtra Today

मुंबई : भांडुप येथील ड्रीम्स मॉलला (Dreams Mall fire) लागलेल्या भीषण आगीत ११ रुग्णांचा बळी गेल्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. आता पालिकेने सर्व मॉल, नर्सिंग होम आणि रुग्णालयांचे पुन्हा ‘फायर ऑडिट’ (Fire audit )करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये ११०९ रुग्णालये-नर्सिंग होम, ७१ मॉलची तपासणी होणार आहे. पालिकेने याआधी केलेल्या तपासणीत सुमारे २५० रुग्णालये आणि २९ मॉलमध्ये अग्निसुरक्षाच नसल्याचे लक्षात आले आहे. ड्रीम्स मॉल आगीच्या चौकशीसाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपायुक्त प्रभात रहांगदळे यांना १५ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

भांडुपमधील ड्रीम्स मॉलला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत सनराईज हॉस्पिटल कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटरवर असलेल्या ११ रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णालये, कोविड सेंटरचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते.

ड्रीम्स मॉलच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

ड्रीम्स मॉलमध्ये ११०८ गाळे असून यातील ४० टक्के सुरू होते. तर कोविडच्या पार्श्वभूमीवर सनराईज कोविड हेल्थ केअर सेंटर १ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होते. पोलिसांनी भांडुप पोलीस ठाण्यात संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये ड्रीम्स मॉलचे संचालक राकेशकुमार वाधवान, निकिता त्रेहान, सारंग वाधवान, दीपक शिर्के व व्यवस्थापनातील व्यक्ती आणि प्रिव्हिलेज हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनी, सनराईज हॉस्पिटलचे संचालक अमितसिंग त्रेहान, निकिता अमितसिंग, स्विटी जैन व व्यवस्थापनातील जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER