गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न आज साकार झालं आहे- मोदी

Modi at Ayodhya

काळानुसार चालणं ही प्रभू रामाची शिकवण. श्रीरामाचा जयघोष केवळ सिया-रामाच्या भूमीतच नाही तर संपूर्ण जगभरात घुमत आहे. ज्याप्रमाणे मावळे छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याचे संरक्षक बनले, तसंच देशातील अनेक लोकांच्या सहयोगाने राम मंदिर निर्माणाचं हे पुण्यकार्य पूर्ण झालं.


अयोध्या : राम मंदिर निर्माणासाठी अनेक पिढ्यांनी आयुष्य वेचलं. आजचा दिवस मंदिरासाठी आयुष्य खर्ची घालणा-यांना अर्पण. अयोध्येतलं राम मंदिर मानवतेला प्रेरणा देणार. काळानुसार चालणं ही प्रभू रामाची शिकवण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन (Ram Temple Bhumi Pujan) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडलं.

विधिवत भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. मोदी म्हणाले, कन्याकुमारीपासून क्षीर भवानीपर्यंत, सोमनाथपासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयेपासून अमृतसरपर्यंत आणि लक्षद्वीपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दीपमय आहे. शतकांची प्रतीक्षा आज पूर्ण होत आहे. रामजन्मभूमी आज मुक्त झाली आहे.

ते म्हणाले की, श्रीराम आमच्या मनात आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणा म्हणून त्यांच्याकडेच आपण पाहतो. हे मंदिर सामूहिक शक्तीचं प्रतीक बनेल. या ठिकाणी येणाऱ्यांना प्रेरणा देईल. या मंदिरामुळे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण होईल. संपूर्ण जगातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतील. राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

शरयू नदीकाठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेला आहे. संपूर्ण देश आज श्री प्रभू रामाच्या भक्तीत रंगून गेला आहे. गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न आज साकार झालं आहे. अनेक वर्षांची रामाची प्रतीक्षा आज संपुष्टात आली.

आज श्रीरामाचा जयघोष केवळ सिया-रामाच्या भूमीतच नाही तर संपूर्ण जगभरात घुमत आहे. सर्व देशवासीयांना, जगभरातील रामभक्तांना आजच्या आनंदाच्या क्षणी कोटी कोटी शुभेच्छा!- असं नरेंद्र मोदी म्हणाले.

तसेच, ज्याप्रमाणे मावळे छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याचे संरक्षक बनले, तसंच देशातील अनेक लोकांच्या सहयोगाने राम मंदिर निर्माणाचं हे पुण्यकार्य पूर्ण झालं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER